इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) चौदाव्या हंगामाच्या उत्तरार्धाची सुरुवात एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स संघाने मुंबई इंडियन्सवर दणदणीत विजय मिळवून केली. दुबई येथे झालेल्या या सामन्यात चेन्नईने २० धावांनी विजय साजरा केला. यासोबतच चेन्नई गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर पोहोचली. मात्र, या विजयादरम्यान चेन्नईचे दोन प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त झाले होते. त्या खेळाडूंच्या दुखापतीवर आता संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे खेळाडू झाले होते दुखापतग्रस्त
मुंबई विरुद्धच्या सामन्यात खेळताना चेन्नईचे दोन महत्त्वपूर्ण खेळाडू जखमी झाले होते. संघाचा अनुभवी फलंदाज अंबाती रायुडू हा वेगवान गोलंदाज ऍडम मिल्नेचा चेंडू लागल्याने जायबंदी झाला होता. यानंतर त्याने मैदान सोडण्याचा निर्णय घेतलेला. तर, गोलंदाजी करताना दीपक चहर हा देखील दुखापतग्रस्त असल्याचे दिसत होता. त्याने वेदनेसह आपले अखेरचे षटक पूर्ण केले होते.
मुख्य प्रशिक्षकांनी दिली प्रतिक्रिया
सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत चेन्नईचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांना रायुडू व चहर यांच्या दुखापतीविषयी विचारले गेले. त्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले,
“आम्हाला वाटले की, रायुडूचे हाड फॅक्चर झाले असेल. मात्र, तसे काहीही नव्हते. एक्स रे मध्ये किरकोळ जखम असल्याचे दिसले. आमचा पुढील सामना २४ तारखेला असून तेव्हा तो, खेळण्यासाठी उपलब्ध असेल. दीपकची दुखापत अजिबात गंभीर नाही. किरकोळ त्रास त्याला झाला. तरीही सोमवारी त्याची चाचणी घेतली जाईल.”
चेन्नईने मिळवला शानदार विजय
दुबई येथील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात चेन्नईची सुरुवात अत्यंत खराब झाली. त्यांचे पहिले चार फलंदाज केवळ २४ धावांमध्ये बाद झाले होते. मात्र, युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याने एकहाती झुंज देत नाबाद ८८ धावांची खेळी करत संघाला १५६ धावांची सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. त्यानंतर गोलंदाजांनी उत्कृष्ट सांघिक कामगिरी करत संघाला २० धावांनी विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
सामनावीर ऋतुराज म्हणतोय, ‘जेव्हा धोनी तुमच्या बरोबर असतो, तेव्हा…’
वानिंदू हसरंगाचे होऊ शकते आयपीएल पदार्पण, आरसीबीची ‘अशी’ असेल संभावित ‘प्लेइंग इलेव्हन’
सूर्यकुमारच्या ‘त्या’ कृत्याचे केले जातेय चाहत्यांकडून कौतुक