इंडियन प्रीमियर लीगचा ४ वेळचा विजेता चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी आणि टीम इंडियाच्या लाखो चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. सीएसके संघासाठी प्रमुख आधार असलेला वेगवान गोलंदाज दीपक चाहर चालू आयपीएल हंगामातून पूर्णतः बाहेर राहण्याची महत्वाची माहिती पुढे येत आहे.
दीपकच्या पाठीच्या दुखापतीने पुन्हा डोके वर काढल्यामुळे तो आयपीएलचा संपूर्ण हंगाम खेळू शकणार नाही. तसेच, त्याची दुखापत पाहता तो आगामी टी20 विश्वचषकाला देखील मुकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चेन्नई सुपर किंग्जने दीपक चाहरला मेगा लिलावात सर्वाधिक 14 कोटी रुपयांची बोली लावून संघात घेतले होते. त्यामुळे चेन्नई संघासाठी आणि भारतीय संघाच्या चाहत्यांसाठी हो मोठा धक्काच आहे.
चाहरला 2021 मध्ये भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील कोलकाता येथे झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी20 सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. त्याच्या मांडीच्या स्नायूंवर ताण आला होता. त्यामुळे तो बंगळुरू स्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दुखापतीतून सावरण्यासाठी मेहनत घेत होता. परंतु यादरम्यान त्याचे पाठीचे जुने दुखणे त्याला त्रास देत आहे. त्याचमुळे आता तो आयपीएलच्या २०२२ हंगामातून बाहेर झाला आहे.
चेन्नई संघाचा निर्णय फसला ?
चाहरने 2016 साली राइजिंग पुणे सुपरजायंट्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर 2018 मध्ये त्याला चेन्नईने आपल्या संघात सहभागी केले होते. तेव्हापासून तो या संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज बनला आहे. त्याने आतापर्यंत चेन्नईकडून 58 सामने खेळताना 58 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएल 2021 मध्ये तर त्याने चेन्नईकडून 15 सामने खेळताना 14 विकेट्स घेतल्या होत्या. चेन्नईला पावरप्लेमध्ये विकेट्स मिळवून देण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती.
याच कारणास्तव यंदाच्या हंगामासाठी चेन्नईने त्याला 14 कोटींची मोठी रक्कम खर्च करत आपल्या ताफ्यात सहभागी केले होते. परंतु आता दुखापतीमुळे तो या हंगामात एकही सामना खेळू शकलेला नाही.
कोलकाता आणि दिल्लीलाही धक्का
कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघालाही सध्या मोठा धक्का बसला आहे. कोलकाताचा वेगवान गोलंदाज रसिक सलाम हा देखील पाठीच्या दुखापतीमुळे आयपीएल २०२२ मधून बाहेर झाला आहे. त्याने या हंगामात २ सामने खेळले होते. आता त्याच्या जागेवर कोलकाताने हर्षित राणा याला संधी दिली आहे. तो कोलकाता संघात २० लाखांच्या मुळ किंमतीत सामील होईल.
याशिवाय दिल्लीचे फिजिओ पॅट्रिक फऱ्हार्ट यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांच्यावर सध्या दिल्ली संघाचे वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘ती’ अविस्मरणीय खेळी, जेव्हा ब्रायन लाराने विरोधकांची पिसे काढत चोपल्या होत्या बिनबाद ४०० धावा
उमरानच्या १४०kphचा चेंडू मारण्याच्या प्रसंगावर हार्दिक म्हणाला, ‘मी अशा गोलंदाजांना असंच जाऊ देणार…’
आई गं! षटकार मारण्याच्या प्रयत्नात त्रिपाठीने स्वत:लाच केले जखमी, वेदनेने मैदानावरच लागला तडफडू