इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा २२ वा सामना मंगळवारी (१२ एप्रिल) खेळला जाणार आहे. मुंबईच्या डॉ. डी वाय पाटील स्टेडियमवर हा सामना होणार असून चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे संघ आमने सामने असतील. हा सामना जिंकत बेंगलोरचा संघ त्यांचा हंगामातील सलग चौथा सामना जिंकण्यासाठी प्रयत्नशील असेल. तर चेन्नईचा संघ त्यांच्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत असेल. या सामन्यापूर्वी बॅकफूटवर असलेल्या चेन्नईसाठी अजून एक वाईट बातमी आली आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर पुन्हा दुखापतग्रस्त झाला असल्याचे समजत आहे.
चाहरला (Deepak Chahar) पुन्हा दुखापत झाली असून आता त्याचे पुनरागमन अशक्य दिसत आहे. तो आयपीएल २०२२च्या (IPL 2022) पूर्ण हंगामाला मुकण्याची दाट शक्यता आहे.
चाहर सध्या बंगळुरू स्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दुखापतीतून सावरण्यासाठी मेहनत घेत आहे. दरम्यान असे वृत्त पुढे येत आहे की, त्याचे जुने पाठीचे दुखणे त्याला त्रास देत आहे. आधीपासूनच दुखापतग्रस्त (Deepak Chahar Back Injury) असलेला हा वेगवान गोलंदाज या आठवड्याच्या शेवटी मुंबईमध्ये चेन्नई संघासोबत जोडला जाणार होता. परंतु आता त्याच्या पाठीच्या दुखापतीने डोके वर काढले असल्याने त्याचे आयपीएलच्या पंधराव्या हंगामातून बाहेर (Ruled Out Of IPL 2022) होणे जवळपास निश्चित आहे. त्याला २०२१ मध्ये भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील कोलकाता येथे झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी२० सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. त्याच्या मांडीच्या स्नायूंवर ताण आला होता.
हंगामातील सुरुवातीचे सलग ४ सामने गमावणाऱ्या चेन्नईला चाहरची कमतरता जाणवत आहे. चेन्नईने त्याला मेगा लिलावात १४ कोटींच्या मोठ्या किंमतीला विकत घेतले होते. परंतु आता पुन्हा त्याला दुखापत झाली असल्याने चेन्नईपुढील समस्या वाढल्या आहेत. त्याच्या पाठींच्या दुखापतीविषयी बोलताना चेन्नईच्या संघ व्यवस्थापनातील कर्मचाऱ्याने प्रतिक्रिया दिली की, “आम्हाला त्याच्या पाठीच्या दुखापतीविषयी अद्याप कसलीही माहिती मिळालेली नाही. तो पुन्हा लयीत परतण्यासाठी आणि आमच्याकडून पुन्हा खेळण्यासाठी खूप मेहनत घेत आहे. परंतु तो सध्या अनुपलब्ध आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
IPL2022| आरसीबी वि. सीएसके सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, ‘हे’ खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!
शमीने झेल सोडल्यामुळे हार्दिक पंड्या रागाने लालेलाल, आगपाखड करतानाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल
शतक झळकावल्यानंतर ऍलिस्टर कूकने गोलंदाजीतून वेधले सर्वांचे लक्ष; विचित्र रन- अपचा व्हिडिओ व्हायरल






