टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी त्याच्या शांत स्वभावामुळे चाहत्यांचा आवडता आहे. धोनी मैदानात आणि मैदानाच्या बाहेर देखील खूप शांत दिसतो. म्हणूनच त्याला ‘कॅप्टन कूल’ असंही म्हटलं जातं.
अलीकडेच माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग यानं धोनीबद्दल एक मोठा खुलासा केला होता. त्यानं सांगितलं होतं की, आयपीएल 2024 मध्ये सीएसकेचा आरसीबीकडून पराभव झाल्यानंतर धोनीचा पारा चढला होता. भज्जीनं तर असा दावा केला होता की, धोनीनं रागाच्या भरात टिव्हीचा पडदाही फोडला होता.
वास्तविक, चेन्नई सुपर किंग्जनं 18 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध आयपीएल 2024 चा शेवटचा लीग सामना खेळला. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी सीएसकेला हा सामना जिंकणे आवश्यक होतं. मात्र त्यांचा 27 धावांनी पराभव झाला. हरभजन म्हणाला की, या पराभवामुळे धोनी खूप निराश झाला होता. तो सामना संपल्यानंतर कोणत्याही खेळाडूशी हस्तांदोलन न करता ड्रेसिंग रूममध्ये गेला. यानंतर त्यानं तेथे लावलेल्या टीव्ही स्क्रीनवर जोरात ठोसा मारून तो फोडला.
मात्र, चेन्नई सुपर किंग्जचे फिजिओथेरपिस्ट टॉमी सिमसेक यांनी हरभजन सिंगचं हे विधान पूर्णपणे खोटं असल्याचं म्हटलं आहे. हरभजन सिंगच्या धोनीबद्दलच्या वक्तव्याशी संबंधित सोशल मीडियावरील पोस्टला उत्तर देताना त्यांनी लिहिलं की, “हा पूर्णपणे मूर्खपणा आहे. एमएस धोनीनं काहीही फोडला नाही. मी त्याला कोणत्याही सामन्यानंतर कधीही रागावलेलं पाहिलं नाही. या खोट्या बातम्या आहेत.”
टॉमी सिमसेक यांच्या प्रतिक्रियेनंतर आता नक्कीच प्रश्न उभा राहतो की, हरभजन सिंगनं धोनीबद्दल खोटं विधान का केलं? तथापि, या संपूर्ण प्रकरणावर अद्याप सीएसकेच्या कोणत्याही खेळाडू किंवा स्टाफ सदस्याकडून प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
चेन्नई सुपर किंग्जचा संघ आगामी आयपीएल हंगामाच्या मेगा लिलावापूर्वी धोनीला अनकॅप्ड खेळाडू म्हणून रिटेन करू शकतो. परंतु धोनीनं अद्याप आयपीएल 2025 मध्ये खेळण्यास सहमती दर्शवलेली नाही.
हेही वाचा –
“विराट कोहलीचा हा शेवटचा इंग्लंड दौरा असेल”, महान गोलंदाजाची धक्कादायक भविष्यवाणी
या खेळाडूनं ठोकलं प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 26वं शतक, अजून टीम इंडियात संधी मिळालेली नाही!
श्रीलंकेच्या क्रिकेटपटूवर कडक कारवाई, आयसीसीनं लावली एका वर्षाची बंदी; कारण जाणून घ्या