इंडियन प्रीमीयर लीगचा १४ वा हंगाम जसजसा जवळ येत आहे तसतसे चर्चांना उधाण येत आहे. येत्या १८ फेब्रुवारीला या हंगामाचा लिलाव पार पडणार आहे. चेन्नईमध्ये हा लिलाव होईल. या लिलावात काही संघ मोठी बोली लावताना दिसू शकतात. यात एमएस धोनी कर्णधार असलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाचाही समावेश आहे.
चेन्नईने या आयपीएल हंगामाआधी केदार जाधव, पियुष चावला, मोनू सिंह, मुरली विजय, हरभजन सिंग आणि शेन वॉटसन या सहा खेळाडूंना मुक्त केले आहे. त्यामुळे सध्या चेन्नई संघात ७ खेळाडूंची जागा शिल्लक असून २२ कोटींपेक्षा अधिक रक्कम हातात आहे. त्यामुळे यंदा चेन्नई हा संघ लिलावात अधिक व्यस्त असणाऱ्या संघांपैकी एक असू शकतो.
त्यातच मागील हंगामात चेन्नईची कामगिरी खास झाली नव्हती. त्यांना आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आले नव्हते. त्यामुळे यंदा ते संघ बांधणीच्या दृष्टीने खेळाडू घेण्याचा लिलावादरम्यान प्रयत्न करतील. या लेखात आपण अशा ५ खेळाडूंबद्दल जाणून घेऊ ज्यांना चेन्नई आपल्या संघात घेण्याचा प्रयत्न करु शकतात.
१) एम सिद्धार्थ –
तामिळनाडूचा २२ वर्षीय डावखुरा फिरकीपटू एम सिद्धार्थने सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत चांगली कामगिरी बजावली होती. त्याने अंतिम सामन्यात चार बळी घेतले होते आणि चेन्नईच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. चेपोक स्टेडियमवर फिरकी गोलंदाज अधिक उपयुक्त ठरतात. त्यामुळे चेन्नई एम सिद्धार्थचा विचार करु शकतात. त्यातच त्याला चेन्नईमध्ये खेळण्याचा अनुभव असल्याने त्याच्यावर चेन्नई संघाचे लक्ष असेल.
२) स्टीव्ह स्मिथ –
चेन्नई सुपर किंग्सची सर्वात मोठी कमजोरी त्यांची मधळी फळी आहे. गतवर्षी चेन्नईने बऱ्याच फलंदांजांना या क्रमांकावर आजमावले होते. पण त्यांच्या प्रदर्शनात चढ-उतार पाहायला मिळाले. त्यामुळे त्यांना अशा अनुभवी फलंदाजाची गरज आहे जो मधली फळी सांभाळू शकतो. यासाठी स्टीव्ह स्मिथ हा चांगला पर्याय आहे. स्मिथची मागच्या हंगामात खास कामगिरी झाली नसल्याने राजस्थान रॉयल्सने मुक्त केले आहे. असे असले तरी स्मिथची क्षमता आणि अनुभव पाहाता, चेन्नई संघ त्याचा विचार करु शकतात. तसेच एमएस धोनीला स्मिथसह खेळण्याचा अनुभव आहे. तो आणि स्मिथ २०१६ आणि २०१७ सालच्या आयपीएल हंगामात रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाकडून एकत्र खेळले आहेत.
३) शिवम दुबे –
रॉयल चॅलेंजर बंगलोरकडून शिवम दुबेला मुक्त केले जाणे ही सर्वात आश्चर्याची बाब होती. तो अष्टपैलू क्रिकेटपटू असून त्याच्याकडे मोठे फटके मारण्याची चांगली क्षमता आहे. त्यामुळे त्याच्याकडे चेन्नई संघाचे लक्ष असेल. दुबेच्या उपस्थितत धोनीचा तळातील फलंदाजीचा तिढा सुटू शकतो. त्यामुळे चेन्नई या खेळाडूवर बोली लावू शकतात.
४) डेव्हिड मलान:
डेव्हिड मलान हा टी२० क्रिकेटमधील एक उत्तम फलंदाज मानला जातो. शेन वॉटसनने गेल्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यामुळे चेन्नईला एक आक्रमक सलामवीराची गरज असल्याने चेन्नई मलानवर बोली लावताना दिसू शकतात. ऋतुराज गायकवाड आणि मलान हे दोघे सलामीला आक्रमक खेळू संघाला चांगली सुरुवात देऊ शकतात.
५) कृष्णप्पा गौतम
गौतम हा उपयुक्त फिरकीपटू असून फलंदाजी देखील तो अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो. त्यामुळे तो केदार जाधवची भूमिका अधिक चांगल्या प्रकारे निभावू शकतो. चेन्नईला मधल्या फळीसाठी अधिक फलंदाजांची गरज आहे. त्यामुळे गौतम ही गरज दूर करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावू शकेल. तसेच तो गोलंदाजीनेही चांगले योगदान देऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
रहाणे बाद असतानाही ठरला नाबाद! तिसऱ्या पंचांच्या हलगर्जीपणावर वैतागला जो रूट
भारतात रोहितचंच राज्य! ठरला ‘हा’ विक्रम करणारा तिसरा वेगवान फलंदाज
‘चेन्नईचा चॅम्पियन’ बनत रोहितने मिळवले खास यादीत स्थान; तीन दिग्गज सलामीवीरांची केली बरोबरी