आज(२५ सप्टेंबर) आयपीएल २०२० च्या हंगामातील ७ वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात होणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने नाणेफक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यासाठी चेन्नई सुपर किंग्सने अंतिम ११ जणांच्या संघात एक बदल केला असून त्यांनी लूंगी एन्गिडीऐवजी जोस हेजलवूडला संधी दिली आहे. तसेच मागील सामन्याप्रमाणे या सामन्यालाही ड्वेन ब्रावो आणि अंबाती रायुडु दुखापतीमुळे मुकले आहेत.
तर दिल्लीने पहिल्या सामन्यात दुखापत झालेल्या आर अश्विनऐवजी अमित मिश्राला अंतिम ११ जणांच्या संघात संधी दिली आहे. तर मोहित शर्माऐवजी आवेश खानला या सामन्यासाठी दिल्ली संघात संधी मिळाली आहे.
दिल्लीचा या हंगामातील हा दुसरा सामना आहे. तर चेन्नईचा या हंगामातील तिसरा सामना आहे. दिल्लीने पहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे. चेन्नईने पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध विजय मिळवला असून त्यांना राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे आज चेन्नई पुन्हा विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल तर दिल्ली विजयाची लय कायम राखण्याचा प्रयत्न करेल.
आत्तापर्यंत दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघ २१ वेळा आमने सामने आले आहेत. त्यातील १५ वेळा चेन्नई संघाने विजय मिळवला आहे. तर दिल्लीने ६ वेळा विजय मिळवला आहे. आता आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
आजच्या सामन्यासाठी असे आहेत दोन्ही संघ
चेन्नई सुपर किंग्सचा ११ जणांचा संघ – मुरली विजय, शेन वॉटसन, फाफ डु प्लेसिस, ऋतूराज गायकवाड, केदार जाधव, एमएस धोनी (यष्टीरक्षक/ कर्णधार), सॅम करन, रवींद्र जडेजा, जोस हेजलवुड, दीपक चाहर, पीयूष चावला
दिल्ली कॅपिटल्सचा ११ जणांचा संघ – पृथ्वी शॉ, शिखर धवन, शिमरोन हेटमीयर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), मार्कस स्टोईनिस, अक्षर पटेल, कागिसो रबाडा, अमित मिश्रा,एन्रिच नॉर्किए, आवेश खान