इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाच्या उर्वरित सामन्यांना येत्या रविवारपासून म्हणजेच १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे सर्वच संघांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. खरंतर या आयपीएल हंगामाला भारतात एप्रिल महिन्यात सुरुवात झाली होती. मात्र, कोरोना व्हायरसचा बायोबबलमध्ये शिरकाव झाल्यानंतर हंगाम स्थगित करण्यात आला. यानंतर उर्वरित ३१ सामने युएईमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यामुळे आता रविवारपासून आयपीएल २०२१ चा युएई टप्पा सुरु होईल. त्यामुळे, पुन्हा एकदा ८ संघ एकमेकांविरुद्ध नव्या उर्जेने लढताना दिसतील. आयपीएल २०२१ मध्ये सहभागी असलेल्या ८ संघांपैकी ३ संघ असे आहेत, ज्यांनी आत्तापर्यंत एकदाही आयपीएलचे विजेतेपद जिंकलेले नाही, तर ५ संघांनी किमान एकदा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे.
या ५ संघांनी जिंकलीत विजेतीपदं
आयपीएल स्पर्धेला २००८ सालापासून सुरुवात झाली. तेव्हापासून आत्तापर्यंत १३ हंगाम खेळवण्यात आले असून यावर्षी १४ वा हंगाम आहे. १३ हंगामात मिळून आत्तापर्यंत ६ संघांनी आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. यात मुंबई इंडियन्स संघानेच तब्बल ५ विजेतीपदं जिंकली आहेत.
सर्वाधिक आयपीएल विजेतीपदं जिंकण्याचा विक्रम मुंबई इंडियन्सच्या नावावर आहे. त्यांच्यापाठोपाठ या यादीत चेन्नई सुपर किंग्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नईने आत्तापर्यंत ३ वेळा विजेतीपदं जिंकली आहेत. याशिवाय कोलकाता नाईट रायजर्सने २ वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे, तर सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि डेक्कन चार्जर्स संघाने किमान एकदा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. डेक्कन चार्जर्स आता आयपीएल स्पर्धेचा भाग नाही.
आत्तापर्यंतचे आयपीएल विजेते –
२००८ – राजस्थान रॉयल्स
२००९ – डेक्कन चार्जर्स
२०१० – चेन्नई सुपर किंग्स
२०११ – चेन्नई सुपर किंग्स
२०१२ – कोलकाता नाईट रायडर्स
२०१३ – मुंबई इंडियन्स
२०१४ – कोलकाता नाईट रायडर्स
२०१५ – मुंबई इंडियन्स
२०१६ – सनरायझर्स हैदराबाद
२०१७ – मुंबई इंडियन्स
२०१८ – चेन्नई सुपर किंग्स
२०१९ – मुंबई इंडियन्स
२०२० – मुंबई इंडियन्स
या संघांना विजेतेपद जिंकण्यात आलंय अपयश
आयपीएलमध्ये सध्या खेळत असलेल्या ८ संघांपैकी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, दिल्ली कॅपिट्स आणि पंजाब किंग्स या संघांना आत्तापर्यंत एकदाही विजेतेपद जिंकता आलेले नाही. विशेष म्हणजे हे तिन्ही संघ आयपीएलचा पहिल्या हंगामापासून भाग आहेत. बेंगलोर संघ आत्तापर्यंत तीनवेळा अंतिम सामन्यातही पोहचला आहे. मात्र त्यांना एकदाही विजेतेपद मिळवता आलेले नाही. तसेच दिल्ली कॅपिटल्सने गेल्यावर्षी पहिल्यांदा अंतिम सामना खेळला होता. मात्र, त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तर, २०१४ साली पंजाब संघाने अंतिम सामना खेळला होता. त्यांना कोलकाताकडून पराभव स्वीकारावा लागला.
बेंगलोर, दिल्ली टॉप ४ मध्ये
आयपीएल २०२१ हंगाम स्थगित होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स या दोन संघांचे ८ सामने खेळून झाले होते. तर अन्य ६ संघांचे ७ सामने पूर्ण झाले होते. या सामन्यांनंतर दिल्ली १२ गुणांसह अव्वल क्रमांकावर होते. तर चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर प्रत्येकी १० गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर होते. तर मुंबई इंडियन्स चौथ्या, राजस्थान रॉयल्स पाचव्या, पंजाब किंग्स सहाव्या, कोलकाता नाईट रायडर्स सातव्या आणि सनरायझर्स हैदराबाद आठव्या क्रमांकावर होते.
आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यातील गुणतालिका पाहिली तर बेंगलोर आणि दिल्ली हे मजबूत स्थितीत असून पहिल्या ४ संघांमध्ये स्थान टिकवून आहेत. त्यामुळे त्यांची कामगिरी दुसऱ्या टप्प्यातही चांगली राहिली, तर त्यांच्याकडे पहिले आयपीएल विजेतेपद जिंकण्याची संधी असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषकात पहिल्यांदाच घडणार अशी घटना
टी२० विश्वचषकादरम्यान धोनीची नक्की भूमिका काय? गांगुलीने केले स्पष्ट
मॅंचेस्टर कसोटीच्या बदल्यात बीसीसीआयने ईसीबीपुढे ठेवला ‘हा’ प्रस्ताव