रविवार (दि. 19 नोव्हेंबर) हा दिवस कोट्यवधी भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी निराशाजनक ठरला. भारतीय संघाला विश्वचषक 2023 अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाकडून 6 विकेट्सने पराभूत व्हावे लागले. यामुळे ऑस्ट्रेलिया 6व्यांदा विश्वचषक विजेता बनला. यावर माजी दिग्गज सुनील गावसकर यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी यावेळी रोहित शर्मा याच्या विकेटविषयी मोठे विधान केले.
काय म्हणाले गावसकर?
रोहित शर्मा (Rohit Sharma) बाद झाल्यानंतर थोड्याच वेळात श्रेयस अय्यर हादेखील 6 धावा करून तंबूत गेला. यावेळी भारतीय संघाची धावसंख्या 10.2 षटकात 81 धावांवर 3 बाद अशी झाली. याचवेळी भारतीय संघावर दबाव आला. यामुळे भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या खराब शॉट सिलेक्शनवर प्रश्न उपस्थित केले.
स्टार स्पोर्ट्सवर समालोचन करताना ते म्हणाले की, “तो शॉट या सामन्याला कलाटणी देणारा क्षण ठरू शकतो. कारण त्यावेळीपर्यंत रोहित खूपच चांगली फलंदाजी करत होता आणि त्याची खेळण्याची पद्धतही तशी आहे. मात्र, जेव्हा मागील दोन चेंडूंवर एक षटकार आणि एक चौकार आला, षटकात 10 धावा आल्या आहेत, तेव्हा त्याने तो शॉट खेळायला नको होते. मला माहितीये की, जर तो शॉट षटकार गेला असता, तर आपण सर्वजण त्याचे कौतुक करत असतो, पण सामन्यात नेहमी एक पाचवा गोलंदाज असतो, ज्यावर तुम्ही निशाणा साधता. त्यावेळी तसे करण्याची काहीच घाई नव्हती.”
याव्यतिरिक्त भारतीय फलंदाजांनी 3-4 विकेट्स पडल्यानंतर ग्लेन मॅक्सवेल, ट्रेविस हेड आणि मिचेल मार्श यांच्या षटकातही खूपच निर्धाव चेंडू खेळले. याविषयी बोलताना गावसकर म्हणाले की, “मॅक्सवेल, हेड आणि मार्श हे ऑस्ट्रेलियाचे पाचवे गोलंदाज आहेत. त्यांच्या 10 षटकात तुम्ही फटकेबाजी करू शकता, पण त्यांच्या षटकात फलंदाजांनी एकेरी धावही घेतली नाही. जर त्यांच्या षटकात 6-6 धावा जरी आल्या असत्या, तरी संघाची धावसंख्या कमीत कमी 20-30 धावा जास्त असती, पण असे घडले नाही.”
रोहित शर्माची खेळी
या सामन्यात भारताच्या 241 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 43 षटकातच सामना संपवला. मात्र, भारतीय गोलंदाजांनी फक्त 47 धावांवर ऑस्ट्रेलियाच्या 3 विकेट्स घेतल्या होत्या. मात्र, त्यानंतर ट्रेविस हेड याने 137 धावांची विजयी खेळी करत ऑस्ट्रेलियाला चॅम्पियन बनवले.
भारतीय संघाच्या डावादरम्यान एक वेळ अशी होती, जेव्हा भारताची धावसंख्या 9.3 षटकात 1 बाद 76 धावा होती. तसेच, रोहित शर्मा 30 चेंडूत 47 धावांवर खेळत होता, पण 31व्या चेंडूवर मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात रोहितने आपली विकेट गमावली. त्याच्या खेळीत 4 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. (cwc 2023 former cricketer sunil gavaskar reacts rohit sharma wicket said shot turning point game)
हेही वाचा-
CWC23 FINAL: 6व्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनताच कमिन्सची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘आम्ही आमचा सर्वोत्तम खेळ…’
IND vs AUS FINAL: पराभवानंतर रोहितने केलं मन मोकळं; पहिली रिऍक्शन देत म्हणाला, ‘चांगली फलंदाजीच केली नाही…’