ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा (CWG) 2026 मध्ये भारताची प्रभावी कामगिरी सुरूच आहे. सहाव्या दिवसाचा (28 जुलै) खेळ संपला असता भारताच्या पदकसंख्येत दोनची भर पडली आहे. लांब पल्ल्याचा धावपटू गुलवीर सिंग आणि वेटलिफ्टर हरजिंदर कौर यांनी रौप्यपदकाची कमाई केली आहे. त्याचबरोबर अनेक बॉक्सर उपांत्य फेरीत पोहोचल्याने भारताची आणखी तीन पदके निश्चित झाली आहेत.
हरजिंदर कौरची कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवत सिल्व्हर मेडल पटकावले
भारतीय वेटलिफ्टर हरजिंदर कौरने महिलांच्या 69 किलो वजनी गटात जबरदस्त कामगिरी केली आहे. तिने 227 किलो वजन उचलून आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरीसह रौप्य पदक जिंकले.
या 29 वर्षीय खेळाडूने स्नॅचच्या तीन प्रयत्नांत 96 किलो, 99 किलो आणि 101 किलो वजन यशस्वीरित्या उचलले. त्यानंतर तिने क्लीन ऍंड जर्कमध्ये 120 किलो, 123 किलो आणि 126 किलो वजन उचलले. स्नॅचमधील 101 किलो आणि क्लीन ऍंड जर्कमधील 126 किलो ही तिची सर्वोत्तम कामगिरी ठरल्याने तिचे एकूण वजन 227 किलो झाले, ज्यामुळे तिचे रौप्यपदक निश्चित झाले.
पंजाबमध्ये राहणाऱ्या हरविंदर कौरचा प्रवास अतिशय खडतर राहिला. लहानपणी ती शेतात जनावरांसाठी चारा कापण्याचे (गवत कापण्याचे) यंत्र चालवण्याचे काम करत होती. त्यामुळे तिच्या हातांना ताकद मिळाली, जी तिच्या वेटलिफ्टिंगचा पाया बनली. तिचे हे CWG मधील दुसरे पदक ठरले आहे. तिने 2022 मध्ये कांस्यपदक जिंकले होते.
यामध्ये सुवर्णपदक कॅनडाच्या चार्लोट सिमोनेऊ आणि कांस्यपदक ऑस्ट्रेलियाच्या न्या फेबे हेमन यांनी जिंकले.
भारतीय सैन्यातील गुलवीर सिंगची 10,000 मीटर शर्यतीत ऐतिहासिक कामगिरी
भारतीय लांब पल्ल्याचा धावपटू गुलवीर सिंगने पुरुषांच्या 10,000 मीटर अंतिम शर्यतीत ऐतिहासिक रौप्यपदक जिंकले. भारतीय सैन्यात नायब सुभेदार म्हणून कार्यरत असलेल्या या खेळाडूने त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली.
27 वर्षीय गुलवीर अंतिम फेरीच्या सुरूवातीला चौथ्या स्थानावर होता, मात्र त्याने सनसनाटी कामगिरी करत इतरांना मागे टाकले आणि दुसरे स्थान गाठले. त्याने ही शर्यत 27:49:78 या वेळेत पूर्ण केली. सुवर्णपदक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या काय रॉबिन्सपेक्षा तो केवळ 0.85 सेकंद मागे राहिला.
गुलवीरचे पहिले आणि भारताचे हे या प्रकारातील स्पर्धेच्या इतिहासातील पहिलेच पदक ठरले आहे. या दोन पदकांमुळे भारताच्या पदकांची संख्या 12 झाली आहे. त्यामुळे भारत नवव्या स्थानी आहे. भारताने आतापर्यंत दोन सुवर्ण, सात रौप्य आणि तीन कांस्य पदक जिंकले आहेत.
तसेच बॉक्सिंगमध्ये जादुमणि सिंग, प्रिया घंघास आणि प्रीति पवार यांनी त्यांच्या प्रकारांमध्ये उपांत्ये फेरीत प्रवेश करत पदक निश्चित केले आहेत. (CWG 2026 Harjinder Kaur shines with silver and Gulveer Singh wins India’s first-ever medal in 10,000m)






