भारताचा 18 वर्षीय बुद्धिबळपटू डी गुकेश खेळाच्या इतिहासातील सर्वात तरुण वर्ल्ड चॅम्पियन ठरला आहे. सिंगापूर येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत गुकेशनं चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून विजेतेपद पटकावलं.
गुरुवारी (12 डिसेंबर) चॅम्पियनशिपच्या 14व्या आणि शेवटच्या फेरीत दोघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. येथे गतविजेता लिरेननं एक छोटीशी चूक केली, जी त्याला महागात पडली. यासह गुकेशनं वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी विश्वविजेता बनून नवा विक्रम रचला आहे. तो आता 18वा जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन आहे.
सिंगापूरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून चीनचा डिंग आणि भारताचा गुकेश यांच्यात जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत चुरशीची लढत सुरू होती. डिंगनं गेल्या वर्षी ही स्पर्धा जिंकली होती. यामुळे या स्पर्धेत त्याचं पारडं जड मानलं जात होतं. दुसरीकडे, गुकेशनं या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या कँडिडेट्स टूर्नामेंटमध्ये चॅलेंजर म्हणून या स्पर्धेत प्रवेश केला होता. विश्व चॅम्पियनशिपमध्ये पोहोचणारा तो महान विश्वनाथन आनंदनंतरचा दुसरा भारतीय आणि जगातील सर्वात तरुण खेळाडू आहे.
गुरुवार गुकेश आणि डिंग यांच्यात चॅम्पियनशिपची 14वी आणि शेवटची फेरी झाली. यापूर्वी झालेल्या 13 फेऱ्यांमध्ये दोघांनी प्रत्येकी 2 सामने जिंकले होते, तर उर्वरित 9 सामने अनिर्णित राहिले होते. अशा स्थितीत दोघांचे समान 6.5 गुण होते. शेवटचा सामनाही अनिर्णित राहिला असता तर दोघांचे प्रत्येकी 7 गुण झाले असते आणि त्यानंतर टायब्रेकरनं निर्णय घेतला गेला असता. मात्र चेन्नईच्या या पठ्ठ्यानं असं होऊ दिलं नाही. गुकेशनं शेवटच्या फेरीत चिनी ग्रँडमास्टरचा पराभव करत 7.5 – 6.5 अशा फरकानं विजेतेपद पटकावलं.
डी गुकेशचं पूर्ण नाव डोमराजू गुकेश आहे. त्याच्या विजेतेपदाच्या आधी रशियन दिग्गज गॅरी कास्परोव्ह हा सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन होता. कास्परोव्हनं 1985 मध्ये वयाच्या 22 व्या वर्षी अनातोली कार्पोव्हचा पराभव करून विजेतेपद पटकावले होतं. या वर्षाच्या सुरुवातीला कँडिडेट्स टूर्नामेंट जिंकल्यानंतर गुकेश हा जागतिक विजेतेपदासाठी आव्हान देणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. यासह महान विश्वनाथन आनंद यांच्यानंतर विश्व चॅम्पियन बनणारा दुसरा भारतीय आहे. पाच वेळच्या विश्वविजेत्या आनंद यांनी 2013 मध्ये शेवटचं विजेतेपद पटकावलं होतं.
हेही वाचा –
आयपीएल 2025 साठी मुंबई इंडियन्सची नवी जर्सी लॉन्च? सोशल मीडियावरील दाव्यामागची कहाणी जाणून घ्या
‘सिक्सर किंग’ युवराज सिंगची एकूण संपत्ती किती? निवृत्तीनंतरही युवी कुठून कमावतो कोट्यवधी रुपये?
गाबा कसोटीसाठी भारतीय संघात होणार अनेक बदल, या दोन खेळाडूंचं बाहेर होणं निश्चित