शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा २७ धावांनी पराभव केला. या विजयासह चेन्नई सुपर किंग्सने चौथ्यांदा आयपीएलच्या विजेतेपदावर नाव कोरले. चेन्नईच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वांनीच अभिनंदन केले. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डानेही चेन्नईच्या विजेतेपदाबद्दल एक पोस्ट शेअर केली होती. मात्र, त्यांनी कॅप्शनमध्ये केलेल्या एका चूकीमुळे त्यांना टीकेचा सामना करावा लागत आहे.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने इंस्टाग्रावर एक पोस्ट शेअर करत लिहिले होते की ‘लुंगी एन्गिडी तुझे चेन्नई सुपर किंग्ससह २०२१ हंगामाचे आयपीएल विजेतेपद मिळवल्याबद्दल अभिनंदन’. मात्र, ही पोस्ट वादग्रस्त ठरली. कारण, एन्गिडीशिवाय फाफ डू प्लेसिस आणि इम्रान ताहीर हे दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू देखील चेन्नई सुपर किंग्स संघाचा भाग आहे. विशेष म्हणजे फाफ डू प्लेसिस अंतिम सामन्यात सामनावीरही ठरला होता.
मात्र, दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने केवळ लुंगी एन्गिडीचे कौतुक केल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. दक्षिण आफ्रिकेने टाकलेल्या पोस्टवर पहिल्यांदा फाफ डू प्लेसिसने कमेंट केली की ‘खरंच???’
त्यानंतर स्टेनने कमेंट केली की ‘हे अकाऊंट कोण चालवत आहे? मला जेवढे माहित आहे फाफ निवृत्त झालेला नाही, इम्रानही निवृत्त झालेला नाही. या दोघांनीही दक्षिण आफ्रिका क्रिकेटसाठी बरीच वर्षे आपली सेवा दिली आहे. तरीही ते उल्लेख करण्यासाठी महत्त्वाचे नव्हते का?’ नंतर दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने ही पोस्ट डिलिट केली.
पण, नंतर स्टेनने या गोष्टीबद्दलची नाराजी ट्वीट करत व्यक्त केली. त्याने म्हटले ‘दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने त्यांच्या ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाऊंटमुळे आता त्यांच्यासाठी नव्या विषयाला सुरुवात केली आहे. जे कोणी ते अकाऊंट्स चालवत आहे, त्यांच्याशी आता बोलण्याची गरज आहे.’
CSA opening a can of worms for themselves with their Twitter and Instagram.
Whoever’s running those accounts needs a talking too.— Dale Steyn (@DaleSteyn62) October 16, 2021
त्याबरोबर स्टेनने पुढे आणखी एक ट्विट केले. त्याने लिहिले की ‘दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने आता कमेंट सेक्शन ब्लॉक केला आहे. माझ्याकडून काही सल्ले आहेत. योग्य गोष्टी करा. पोस्ट डिलिट करा आणि सर्व खेळाडूंना सामील करा आणि पोस्ट करा. स्वत:च्या प्रतिष्ठेला आणि होणाऱ्या उपहासापासून वाचवा.’
CSA now blocked the comments section.
Here’s some advice.
Do the right thing.
Delete the post and add all the men involved, save yourself the embarrassment and ridicule.— Dale Steyn (@DaleSteyn62) October 16, 2021
गेल्या काही दिवसात दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डामध्ये काहीतरी वाद असल्याची बरीच चर्चा होती. त्यातच दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने फाफ डू प्लेसिस आणि ताहीरला आगामी टी२० विश्वचषकासाठी देखील १५ जणांच्या संघात संधी दिलेली नाही. त्यांना वार्षिक करारातूनही वगळण्यात आले आहे.
फाफ डू प्लेसिसने याचवर्षी फेब्रुवारीमध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याने मर्यादीत षटकांच्या क्रिकेटवर लक्ष देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले होते. मात्र, तो गेल्या बराच काळापासून दक्षिण आफ्रिकेकडून खेळताना दिसला नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
धोनीकडून घडली मोठी चूक अन् जडेजा- गायकवाडने लावला डोक्याला हात; व्हिडिओ पाहाच
द्रविड टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यामागे ‘लॉर्ड’ शार्दुल कनेक्शन?