जागतिक अजिंक्यपद कसोटी क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्युझीलंड दरम्यान जाणार आहे. त्या सामन्यापूर्वी या दोन्ही संघांतील खेळाडूंविषयी अनेक मते मांडली जात आहेत. अशाप्रकारे ह्या स्पर्धेसाठी वातावरण निर्मिती होत आहे. आता इंग्लंड संघाचे माजी कर्णधार डेव्हिड गॉवर यांनी विराट कोहली आणि केन विलियम्सनची प्रशंसा करतांना त्यांना वर्तमान काळातील महान फलंदाज असे संबोधन दिले आहे. 18 जूनपासून साऊथटम्पच्या एजेस बाऊल मैदानावर होण्याऱ्या अंतिम सामन्याला 2 आठवडयांपेक्षा कमी कालावधी बाकी असतांना गॉवर यांनी हे विधान केले आहे.
ही कोहली आणि विलियम्सन या दोघांसाठी मोठी संधी ठरणार आहे, कारण हे दोघे पहिल्या-वहिल्या जागतिक अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अनुक्रमे भारत आणि न्युझीलंड या संघाचं नेतृत्व करणार आहेत.
गॉवर यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ सोबत बोलतांना सांगितले की, “आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वर्तमान काळातील महान फलंदाजांमध्ये विराट आणि केन विलियम्सनची गणना होते. हे दोन्ही अत्यंत तुल्यबळ प्रतिस्पर्धी आहेत, त्यामुळे हा अंतिम सामना हा उत्कंठावर्धक असेल.
एकूण 117 कसोटी सामने आणि 114 एकदिवसीय सामन्यांत इंग्लंडच प्रतिनिधित्व करण्याऱ्या गॉवर यांनी सांगितले की, भारत आणि न्युझीलंड दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचण्याच्या लायकीचे संघ आहेत. आपल्या तंत्रशुद्ध शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या गॉवर यांनी सांगितले की दोन गुणवान संघामधील अंतिम सामना देखील तितकाच दर्जेदार होईल.
त्यांनी सांगितले की, ‘आपल्याला दोन खूपच चांगल्या आणि दर्जेदार संघात अंतिम लढत बघायला मिळणार आहे, मला आशा आहे की हा एक चांगला खेळ, तुल्यबळ सामना होईल. जेव्हा कधी लोक कसोटी सामन्याच्या परिस्थितीविषयी बोलत असतात, तेव्हा आपण अशी आशा करतो की परिस्थिती गोलंदाजीसाठी काही प्रमाणात अनुकूल, काही प्रमाणात फलंदाजीसाठी, तर फिरकीसाठी काही प्रमाणात अनुकूल असली पाहिजे.’
एजेस बाऊलच्या खेळपट्टीविषयी बोलताना गॉवर यांनी सांगितले की ‘या ठिकाणची परिस्थिती फलंदाजांना, वेगवान गोलंदाजीला आणि तसेच फिरकीपटूना देखील मदत करेल, कारण खेळ पुढे जात असतो. मला वाटते की, ते प्रयत्नपूर्वक अशी खेळपट्टी तयार करतील जी खेळाची वास्तविक स्थिती दर्शवेल आणि दोन्ही संघांना आपल्या सगळ्या पैलूंचा उपयोग करण्याची संधी प्राप्त होईल.’
महत्त्वाच्या बातम्या –
फ्रेंच ओपन: झ्वेरेव आणि त्सित्सिपासचा अंतिम ४ जणांमध्ये प्रवेश; उपांत्य सामन्यात येणार आमने-सामने
“आयपीएलमूळे इंग्लंडवाले आपले तळवे चाटतात”, भारतीय दिग्गजाची जीभ घसरली