आयपीएल २०२२ ची सुरुवात २६ मार्चपासून होणार आहे. पहिला सामना मागच्या हंगामातील विजेता आणि उपविजेता संघ, म्हणजेच चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात होणार आहे. केकेआरला आगामी हंगामातील पहिला सामना खेळण्याचा मान मिळाला असला, तरी त्यांच्या संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. केकेआरचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आणि दिग्गज फलंदाज ऍरॉन फिंच आगामी आयपीएल हंगामातील पहिल्या पाच सामन्यांसाठी उपलब्ध राहू शकणार नाहीत, जे आधीपासून अपेक्षित होते. केकेआरचा मेंटॉर डेविड हसीने याविषयी स्पष्टीकरण दिले आहे.
कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाने आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात ऑस्ट्रेलायाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याला खरेदी करण्यासाठी ७.२५ कोटी रुपये खर्च केले आहेत. तसेच ऍरॉन फिंच (Aaron Finch) एका बदली खेळाडूच्या रूपात संघासोबत सहभागी झाला आहे.
इंग्लंडचा फलंदाज एलेक्स हेल्सने आयपीएलमधून माघार घेतल्यानंतर केकेआरने फिंचला १.५० कोटी रुपयांमध्ये संघात सामील केले. असे असले तरी, आता हे दोन्ही महत्वाचे खेळाडू पहिल्या पाच सामन्यांमध्ये केकेआरचे प्रतिनिधित्व करू शकणार नाहीत. यामागचे कारण आहे, ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौरा.
केकेआरचा मेंटॉर डेविड हसीने कमिन्स आणि फिंच यांच्या अनुपस्थितीवर महत्वाची प्रतिक्रिया दिली. तो म्हणला, “होय, या दोन्ही खेळाडूंची गैरहजेरी आमच्यासाठी चिंतेचा विषय आहे. प्रत्येकच संघाला वाटते की, त्यांचे सर्वश्रेष्ठ खेळाडू सोबत असावे. परंतु, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा महत्वाचे काहीच नसले पाहिजे. प्रत्येक खेळाडूला स्वतःच्या देशासाठी क्रिकेट खेळायचे असते. त्यामुळे त्यांच्या काही जबाबदाऱ्या असतात. मला वाटते की, कमिन्स आणि फिंच सुरुवातीच्या ५ सामन्यांना उपस्थित राहू शकणार नाहीत. पण ते फिट आहेत आणि याठिकाणी येताच खेळण्यासाठी पूर्णपणे तयार असतील.”
सध्या ऑस्ट्रेलिया संघ पाकिस्तान दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशी तीन सामन्यांची कसोटी आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाईल. कसोटी मालिकेतील तिसरा सामना सध्या लाहोरमध्ये खेळला जात आहे. हा दौरा ५ एप्रिलला संपणार असून त्यानंतर कमिन्स आणि फिंच भारतासाठी रवाना होऊ शकतात. कसोटी मालिकेत कमिन्स, तर एकदिवसीय मालिकेत नेतृत्वाची जबाबदारी फिंचवर आहे.
भारतात आल्यानंतर या दोघांनाही तीन दिवसांच्या विलगीकरणात राहावे लागणार आहे. म्हणजेच ८ एप्रिलपर्यंत दोघेही केकेआरच्या बायो बबलमध्ये सहभागी होऊ शकतात. केकेआराला त्यांचा पाचवा सामना १० मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यासाठी संघात या दोन्ही दिग्गजांचे आगमन होईल अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.
महत्वाच्या बातम्या –
एका अंपायरने बदलली होती रबरी चेंडूने क्रिकेट खेळणाऱ्या शाकिबची जिंदगी
आयपीएलच्या तीन नव्या नियमांचे रोहित शर्माकडून कौतुक, वाचा काय म्हणाला मुंबई इंडियन्सचा कर्णधार