इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या टी२० मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात इंग्लंडने यजमान दक्षिण आफ्रिकेला ९ गड्यांनी पराभूत करत मालिकेत ३-० ने विजय मिळवला. इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेत येऊन टी२० मालिकेत ‘क्लीन स्वीप’ करण्याची ही पहिलीच वेळ आहे. मात्र, सामनावीर आणि मालिकावीर ठरलेला इंग्लंडचा फलंदाज डेविड मलान या अखेरच्या सामन्यात संधी असतानाही आपले शतक पूर्ण करू शकला नाही.
इंग्लंडने मिळवला एकतर्फी विजय
यजमान दक्षिण आफ्रिकेने १९१ धावा काढत इंग्लंडसमोर १९२ धावांचे आव्हान ठेवले होते. इंग्लंडच्या जॉस बटलर व डेविड मलान यांनी अप्रतिम फलंदाजी करत इंग्लंडला ९ गड्यांनी विजय मिळवून दिला. बटलरने ४६ चेंडूत ६८, तर मलानने ४७ चेंडूत धुवाधार ९९ धावा फटकावल्या. दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी १६७ धावांची अभेद्य भागीदारी केली. मलानकडे आपले शतक पूर्ण करण्यासाठी संधी होती. मात्र, त्याला शतक व विजयाचे समीकरण लक्षात न आल्याने तो आपल्या शतकापासून वंचित राहिला.
अशी झाली गफलत
खरं तर मलानला शतक पूर्ण करण्यासाठी दोन धावेची गरज होती. मात्र, त्याला वाटले शतकासाठी एकच धाव हवी आहे. त्याने अठराव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर एक धाव काढत संघाला विजय मिळवून दिला. या एकेरी धावेआधी त्याने दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर प्रत्येकी षटकार आणि चौकार खेचला होता. त्याचा फॉर्म पाहता तो सहज चेंडू सीमापार पाठवू शकला असता. परंतु त्याला शतके पूर्ण करण्यासाठी किती धावा हव्या आहेत, हे समजण्यात गफलत झाली.
मला गणिताची शिकवणी लावावी लागेल
मलान ९९ धावांवर नाबाद राहिला, तरी त्याला सामनावीर व मालिकावीर असे दोन्ही पुरस्कार मिळाले. सामन्यानंतर बोलताना मलान म्हणाला, “खरं सांगायचं झालं, तर शतकाला किती धावा हव्या आहेत हेच मला माहीत नव्हते. म्हणून मी एक धाव काढली. मला आता गणिताची शिकवणी लावावी लागणार आहे.”
इंग्लंडचा संघ टी२० मालिका आपल्या नावावर केल्यानंतर आता तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करेल. पहिला सामना ४ डिसेंबर रोजी खेळवला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
Video: आयपीएल २०२० मध्ये एकही सामना खेळायला न मिळालेल्या फलंदाजाची कमाल; ५५ चेंडूत ठोकले दीडशतक
ट्रेंडिंग लेख-
लाजवाब! ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० मालिकेत खोर्याने धावा काढणारे ३ भारतीय खेळाडू
लईच धुतलं! ‘या’ तीन भारतीय फलंदाजांकडून टी२० मध्ये कांगारू गोलंदाजांची सर्वाधिक स्ट्राईक रेटने धुलाई






