आयपीएल २०२२ चे मेगा ऑक्शन पार पडले आणि प्रत्येकाने पेपरावर कोणता संघ मजबूत वाटतो, याविषयी अंदाज सांगितले. कोणी राजस्थान, कोणी लखनऊ तर कोणी दिल्लीला टॉपवर ठेवले. मात्र, बहुतांशी जणांनी एक अंदाज समान होता, ते म्हणजे पहिल्यांदाच आयपीएल खेळत असलेली गुजरात टायटन्स तळाशी राहणार. अनेकजण म्हटले यांचा संघ ऑक्शनमध्येच गंडलाय. चर्चा सुरूच राहिल्या आणि आयपीएलचा शुभारंभ झाला.
पहिल्याच सामन्यापासून त्यांनी अशी काही विजयाची लय पकडली की, दोन मॅचेस शिल्लक असतानाच १८ पॉईंट्ससह त्यांनी प्ले ऑफ्स गाठली. प्रत्येक सामन्याला नवा हिरो. प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखली. वरिष्ठ म्हटलं गेलेल्या सर्वांनी ‘जिथे कमी तिथे आम्ही’ म्हणत, गुजरातच्या विजयात मोठा वाटा उचलला. पहिला क्वालिफायर झाला, राजस्थान रॉयल्सविरुद्ध कोलकात्यात. बटलरने पुन्हा जोश दाखवत तुफान आणले. १८९ धावांचा पाठलाग करताना गुजरात ढेपाळेल असं वाटत असताना, उभा राहिला या संघाचा खऱ्या अर्थाने सर्वात सीनियर प्लेयर डेव्हिड मिलर. जवळपास अशक्यप्राय वाटत असलेला विजय त्याने आपल्या वादळी खेळीने, गुजरातच्या पारड्यात टाकला. अनेकांना गुजरात जिंकल्याचा आनंद झाला. मात्र, त्याहीपेक्षा त्यांचा आवडता मिलर, कितीतरी दिवसांनी किलर अंदाजात दिसला याच समाधान लाभलं.
एकेकाळी आयपीएलमध्ये ज्याच नाणं खणखणीत वाजल जायचं, तो मिलर मधल्या काळात कुठेतरी गायब झाला होता. पण या हंगामाने सर्वांना जुना मिलर मिळाला. त्याच्याच पुनरागमनाची ही कहाणी.
डेव्हिड मिलर हे नाव व भारतीय सर्वात पहिल्यांदा कळावे २०१३ आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबसाठी खेळताना. खरं तर त्याने आधीच्यावर्षीच आयपीएल डेब्यू केलेला. मात्र, खेळायला मिळाल्या फक्त तीन सामने. २०१३ ला तो सर्व सामने खेळला. १३ सामन्यांमध्ये ३००पेक्षा जास्त धावा काढल्या होत्या. पण खरा किलर मिलर दिसला हंगामाच्या शेवटच्या सामन्याला. मोहालीच्या स्टेडियमवर समोर होती आरसीबी. गेल, पुजारा आणि डिव्हिलियर्सने शानदार फटकेबाजी करत १९० रन्स चोपल्या.
आव्हानाचा पाठलाग करताना ८ षटकांमध्ये पंजाबच्या ५० धावांवर तीन विकेट गेल्या. त्यावेळी ग्राउंडवर आला मिलर. तो सेट व्हायचा प्रयत्न करत होता, तेवढ्यात कॅप्टन डेव्हिड हसीने तंबूचा रस्ता धरला. त्यानंतर मात्र आयएस बिंद्रा स्टेडियमवर फक्त आणि फक्त एकच नाव चाललं ते म्हणजे डेव्हिड मिलर. अजिबात आडवीतिडवी फलंदाजी न करता, सरळ बॅटने चौकार-षटकारांचा अक्षरशः पाऊस पाडत, ३८ चेंडूंवर झंझावाती शतक त्याने ठोकले. पंजाबने दोन षटक राखून मॅच जिंकली. तो हंगाम पंजाबसाठी संपला होता. पण, पुढच्या हंगामानसाठी त्यांना एक सुपरस्टार मिळाला.
पुढच्या सिझनची सुरुवात झाली युएईत आणि पंजाबची गाडी सुसाट सुटली. ऑस्ट्रेलियन जॉर्ज बेलीने कॅप्टन म्हणून अशी काही टीम सांभाळली की, पंजाब डायरेक्ट टेबलच्या टॉपवर गेली. सारी टीमच तुफान खेळली पण दोन जणांनी खरा राडा केला. एक होता ग्लेन मॅक्सवेल आणि दुसरा डेव्हिड मिलर. या दोघांना साऱ्या संघाचे गोलंदाज अक्षरशः चळाचळा कापत होते. पंजाब अंतिम सामन्यापर्यंत गेली पण त्यांना ट्रॉफी उंचावता आली नाही. २०१५ हंगामपण त्याने गाजवला.
त्यानंतर मात्र मिलरचा ‘किलर इन्स्टिंक्ट’ जवळपास संपला. त्याला पंजाबचा कर्णधार बनवलं पण संघाने नेहमीप्रमाणे माती खाल्ली. एकवेळ पंजाबचा सर्वात मोठा मॅचविनर असलेल्या मिलरला प्लेइंग इलेव्हनमधील जागेसाठी झगडावं लागलं. २०१७ ते २०१९ अशा तीन वर्षात फक्त १८ सामने त्याला खेळायला मिळाल्या. बॅटमधून आले केवळ एक अर्धशतक. २०२० साठी राजस्थान रॉयल्सने त्याला संघात घेतले पण विश्वास दाखवला नाही. एक मॅच खेळायला दिली पण त्यातही तो शून्यावर आऊट झाला. पुढच्या हंगामालाही कधी आत तर कधी बाहेर झाल्याने त्याला आपला खरा गेम दाखवायची संधी मिळाली नाही. मिलर संपला यावर साऱ्यांनी जवळपास शिक्कामोर्तबच केले.
२०२२ लिलाव आले आणि पहिल्या दिवशी मिलर अनसोल्ड राहिला. मिलर यावर्षी दिसणारच नाही असे वाटत असताना. नव्याने दाखल झालेल्या गुजरात टायटन्सने त्याच्यावर विश्वास दाखवला..गुजरातच्या मिडल ऑर्डरमध्ये कोणी बडे नाव नसल्याने मिलरवर खास जबाबदारी होती. त्याने आपल्याला दिलेली जबाबदारी पुरती ओळखली. सीएसकेविरुद्ध जवळपास हरलेली सामने त्यांनी नॉट आउट राहत काढून दिली, आरसीबीविरूद्धही समानच. त्यानंतर सर्वात जास्त गरज असताना क्वालिफायर १ मध्ये, त्याने खऱ्या अर्थाने आपला जुना अंदाज दाखवला. राजस्थान रॉयल्सविरुद्ध त्याची ३८ बॉल ६८ ची खेळी आणि त्यातही शेवटच्या षटकामध्ये १६ धावांची गरज असताना सलग तीन षटकार मारल्यावर सारेच म्हणले, “हा खरा मिलर आणि हा त्याचा किलर पट्टा”.
मोठा खेळाडू नेहमीच मोठा असतो. हे मिलरच्या या सिझनच्या परफॉर्मन्समधून दिसून आलं. इथून पुढे मिलरचा तोच किलर अंदाज वारंवार पाहायला मिळेल, अशीच अपेक्षा सारे फॅन्स करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
यजमान संघावर विजय मिळवताच खूष झालेल्या दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने केले मोठे विधान
चेंडू आहे की बंदुकीची गोळी? आवेश खानचा खतरनाक यॉर्कर, डुसेनच्या बॅटचे केले दोन तुकडे
इतकी हिंमत!! पंतला धावबाद करण्यासाठी रबाडाची चिटिंग, भर मैदानात भारतीय कर्णधाराला दिला धक्का