टी20 वर्ल्ड कप 2026 सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी सहभागी होणाऱ्या सर्वच संघांनी तयारीला वेग दिला आहे. भारतीय संघही याला अपवाद नाही. विश्वचषकाच्या आधी टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका खेळत आहे. या मालिकेतील अखेरचा सामना 31 जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे. मात्र या मालिकेदरम्यान भारतीय संघातील एका खेळाडूबाबत मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे.
हा खेळाडू म्हणजे संजू सॅमसन. टी20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात निवड झालेल्या संजू सॅमसनची न्यूझीलंडविरुद्धची कामगिरी मात्र आतापर्यंत निराशाजनक ठरली आहे. मालिकेत झालेले चार सामने संजूच्या दृष्टीने विसरण्यासारखेच ठरले आहेत. संघ व्यवस्थापनाने त्याला त्याची आवडती सलामीची भूमिका दिली असली, तरीही संजूला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले आहे. धावा तर दूरच, पण चांगली सुरुवातही त्याला करता आलेली नाही.
टी20 वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर झाला, तेव्हा संजू सॅमसन हा पहिल्या पसंतीचा विकेटकीपर आणि सलामीवीर मानला जात होता. मात्र आता परिस्थिती बदलताना दिसत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांत ईशान किशनने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना आक्रमक खेळी साकारली. ईशानच्या या कामगिरीमुळे संघ व्यवस्थापनाचा विश्वास त्याच्याकडे झुकताना दिसतो आहे.
भारत-न्यूझीलंड मालिकेतील आता फक्त एकच सामना उरला आहे. 31 जानेवारीला होणाऱ्या या सामन्यानंतर भारतीय संघ थेट 7 फेब्रुवारीला टी20 वर्ल्ड कपमधील पहिल्या सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे. त्यामुळे हा अखेरचा टी20 सामना संजू सॅमसनसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
हा सामना तिरुवनंतपुरम येथे होणार असून ते संजूचे होमग्राउंड आहे. त्यामुळे संजूला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता जवळपास निश्चित मानली जात आहे. मात्र घरच्या मैदानावर मिळणाऱ्या या ‘लाईफलाईन’चा संजू कितपत फायदा करून घेतो, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. या सामन्यातील त्याची कामगिरीच टी20 वर्ल्ड कपमध्ये त्याचे भवितव्य ठरवू शकते.






