---Advertisement---

अगरवाल, शॉच्या पदार्पणामुळे भारताच्या वनडे क्रिकेट इतिहासात चौथ्यांदाच घडले असे-

On: बुधवार, फेब्रुवारी 5, 2020 12:35 PM
---Advertisement---

हेमिल्टन। आज(5 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात सेडन पार्क येथे पहिला वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 4 बाद 247 धावा केल्या आहेत. भारताकडून आज पृथ्वी शॉ आणि मयंक अगरवालने सलामीला फलंदाजी केली.

विशेष म्हणजे या दोघांनीही आजच्या सामन्यातून वनडे क्रिकेटमध्ये पदार्पणही केले आहे. त्यामुळे भारताच्या वनडे क्रिकेट इतिहासात असे चौथ्यांदाच घडले की एकाच सामन्यातून पदार्पण करणाऱ्या 2 फलंदाजांनी सलामीला फलंदाजी केली आहे.

याआधी सर्वप्रथम असे 13 जूलै 1974 ला झाले होते. त्यावेळी भारत इंग्लंड विरुद्ध लीड्स येथे पहिला वनडे सामना खेळला होता. या सामन्यात सुनील गावस्कर आणि सुधीर नाईक यांनी सलामीला फलंदाजी केली होती. त्यानंतर 1976 ला पार्थसारथी शर्मा आणि दिलीप वेंगसकर यांनी न्यूझीलंड विरुद्ध काईस्टचर्च येथे झालेल्या सामन्यात वनडे पदार्पण करताना सलामीलाही फलंदाजी केली होती.

यानंतर भारताकडून 2016 मध्ये हरारे येथे झिम्बाब्वे विरुद्ध केएल राहुल आणि करुण नायर यांनी वनडे पदार्पणाबरोबर सलामीलाही फलंदाजी केली होती.

आज वनडे पदार्पण करताना मयंक आणि शॉने चांगली सुरुवात केली होती. त्यांनी 50 धावांची सलामी भागीदारीही रचली. पण चांगल्या सुरुवातीनंतर शॉ 20 धावा करुन तर मयंक 32 धावा करुन बाद झाला. पण त्यांनी 50 धावांची भागीदारी करुन एक खास विक्रम केला.

एकाच सामन्यातून वनडे पदार्पण करताला सलामीला अर्धशतकी भागीदारी करणारी शॉ आणि मयंकची पहिलीच जोडी ठरली आहे.

याआधी गावस्कर आणि नाईक यांनी पदार्पणावेळी 44धावांची, पार्थसारथी शर्मा आणि दिलीप वेंगसकर यांनी पदार्पणावेळी 7 धावांची सलामी भागीदारी रचली होती. तसेच राहुल आणि नायर यांनी वनडे पदार्पणावेळी 11 धावांची सलामी भागीदारी केली होती.

आजच्या सामन्यात मयंक आणि शॉने दिलेल्या चांगल्या सुरुवातीनंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने भारताचा डाव भक्कमपणे सांभाळला. विराटने 51 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर अय्यरने कारकिर्दीतील पहिले शतक करताना 103 धावांची खेळी केली. तसेच केएल राहुलने नाबाद 88 धावांची खेळी केली. तर शेवटच्या काही षटकात केदार जाधवने आक्रमक फलंदाजी करताना नाबाद 26 धावांची खेळी केली.

भारताकडून एकाच सामन्यात वनडे पदार्पणाबरोबरच सलामीला फलंदाजी करणारे फलंदाज – 

सुनील गावस्कर/ सुधीर नाईक – विरुद्ध इंग्लंड, लीड्स, 1974 (भागीदारी – 44 धावा)

पार्थसारथी शर्मा/ दिलीप वेंगसकर – विरुद्ध न्यूझीलंड, क्राइस्टचर्च, 1976 (भागीदारी – 7 धावा)

केएल राहुल/ करुण नायर – विरुद्ध झिम्बाब्वे, हरारे, 2016 (भागीदारी – 11 धावा)

पृथ्वी शॉ/मयंक अगरवाल – विरुद्ध न्यूझीलंड, हेमिल्टन, 2020 (भागीदारी – 50 धावा)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---