भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीद्वारे शुबमन गिलने कसोटी पदार्पण केले होते. या दौऱ्यातील कामगिरीच्या जोरावर त्याची इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत निवड करण्यात आली होती. परंतु पहिल्या कसोटी सामन्यातील अर्धशतक वगळता पुढील सामन्यांमध्ये त्याला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. त्यामुळे गिलच्या निराशाजनक कामगिरीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच माजी भारतीय फलंदाज दिप दासगुप्ता यांनी त्याला समर्थन दिले आहे.
दासगुप्ता यांनी गिलचा बचाव करत म्हटले आहे की, “गिल पुनरागमन करेल आणि संघासाठी धावा देखील करेल. परंतु, संघ व्यवस्थापकांनी त्याच्यावरील विश्वास कायम ठेवायला हवा.”
शुबमन गिल पुनरागमन करेल
एका मुलाखतीत दिपदास गुप्ता यांनी म्हटले की, “मला वाटत आहे की गिल त्याच्या चुकांमध्ये सुधारणा करेल. ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या मालिकेत तो पॅट कमिन्सच्या बाहेर जाणाऱ्या चेंडुंवर बाद होत होता. पुढे यावर त्याने तोडगा काढला होता. तसेच इंग्लंडविरुद्ध झालेल्या मालिकेत इंग्लंडच्या गोलंदाजांनी त्याला आत येणारे चेंडू टाकले होते. स्विंग होऊन आत येणारे चेंडू खेळणे गिलला कठीण जात होते. आत येणाऱ्या चेंडूंवर तो पायचीत होत होता किंवा त्याच्या त्रिफळा उडत होता.”
तसेच पुढे ते म्हणाले, “ही गिलसारख्या युवा खेळाडूंसाठी शिकण्याची वेळ आहे. मला अशी आशा आहे की, त्याला संधी मिळेल आणि विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत तो धावा करेल. त्याने तयार राहायला हवं कारण कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी त्याला खूप क्रिकेट खेळायचं आहे. तो आयपीएलमध्ये देखील खेळणार आहे. मी अशा करतो की तो आयपीएलमध्ये चांगले प्रदर्शन करेल.”
चुकांमधून तो खूप काही शिकेल
तसेच पुढे ते म्हणाले, “मला अशी आशा आहे की, त्याच्यावर पूर्ण विश्वास दाखवला जाईल. हा क्रिकेटपटूच्या आयुष्यातील एक भाग आहे. उतार आणि चढाव तर येतच असतात. तसेच तो आपल्या चुकांमधून खूप काही शिकेल.”
महत्त्वाच्या बातम्या-
बॅटिंग-बॉलिंग एकच नंबर, इंग्लंड विरोधात मैदानात उतरण्यापुर्वी हार्दिकचा कसून सराव; Video व्हायरल
टीम इंडियाला मोठा धक्का! ‘हा’ स्टार गोलंदाज पहिल्या टी२० सामन्यातून बाहेर? वाचा कारण
टी२० क्रिकेटमध्ये इतिहास रचण्यापासून विराट-रोहित एक पाऊल दूर, कोण मारणार बाजी?