भारताचा माजी कर्णधार आणि सध्याचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीचा गुरुवारी (८ जुलै) ४९ वा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याला अनेक आजी-माजी खेळाडूंनी शुभेच्छा देताना त्याच्या काही जुन्या आठवणी ताज्या केल्या. दरम्यान, भारताचे माजी यष्टीरक्षक फलंदाज दीप दासगुप्ता यांनी देखील गांगुलीचा एक किस्सा सांगितला आहे.
एका युट्यूब व्हिडिओमध्ये दासगुप्ता यांनी २००२ सालची गांगुलीबाबतची आठवण सांगितली आहे. त्यावेळी भारताला दिल्लीमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध कसोटी सामना खेळायचा होता आणि भारताचा तात्कालिन कर्णधार असलेल्या गांगुलीला त्याच्या फलंदाजीबद्दल शंका होती. अनेक युवा खेळाडूंप्रमाणेच दासगुप्ता यांना देखील गांगुलीकडून बराच पाठिंबा मिळाला होता.
दासगुप्ता यांनी सांगितले की “मी गांगुलीसाखरं कोणाला मानसिकरित्या मजबूत पाहिलेलं नाही. एकदा झिम्बाब्वे विरुद्धच्या दिल्लीत होणाऱ्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला त्याने मला सांगितलं होतं की ‘हा कदाचीत माझा शेवटचा सामना असेल.’ तो जे काही बोलत होता ते ऐकून मी आश्चर्यचकीत झालो आणि मला विश्वासच बसेना. मला म्हणायचं आहे की तो कर्णधार होता, तो स्वत:लाच संघातून कसा काय वगळू शकत होता. पण त्याला खात्री होती की जर त्याने धावा केल्या नाहीत, तर हा त्याचा शेवटचा सामना असू शकतो. नंतर काय झालं असेल, याचा अंदाज लावा.”
पुढे दासगुप्ता म्हणाले, “त्यावेळी झिम्बाब्वे संघ चांगला होता. संघात फ्लॉवर बंधू, हिथ स्ट्रिक असे खेळाडू होते. दुसऱ्या दिवशी तो मैदानात उतरला आणि त्याने शतकी खेळी केली. त्यानंतर संध्याकाळी मी त्याला विचारले की तो आनंदी आहे का? त्यावेळी तो म्हणाला, ‘मला खूप आनंद झाला आहे.’ महान असेच बनतात. यातून कळते की गांगुली मानसिकदृष्ट्या किती मजबूत होता.”
तसेच दासगुप्ता पुढे म्हणाले की ‘आज भारतीय संघ ज्या ठिकाणी आहे, त्यात गांगुलीचे योगदान मोठे आहे. तो करोडो लोकांसाठी प्रेरणा आहे.’ (Deep Dasgupta shares interesting story on Sourav Ganguly.)
गांगुली भारतीय क्रिकेटमधील महान कर्णधारांमध्ये गणला जातो. ज्यावेळी भारतीय संघ मॅच फिक्सिंगसारख्या संकटाचा सामना करत होता, त्या कठीण काळात गांगुलीने भारतीय संघाचे नेतृत्व स्विकारले होते. त्याच्याच नेतृत्वाखाली विरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, हरभजन सिंग, एमएस धोनी यांसारख्या खेळाडूंनी आपली वेगळी ओळख क्रिकेट जगतात निर्माण केली.
महत्त्वाच्या बातम्या –
टीम इंडियाचे नवे युवराज सिंग! माजी अष्टपैलूला ‘या’ तिघांमध्ये दिसते स्वत:ची छबी
टी२० विश्वचषकावर पुन्हा टांगती तलवार, यंदाही होऊ शकतो रद्द? गांगुलीने दिला इशारा