आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धा येत्या जून महिन्यात सुरू होत आहे. यासाठी गतविजेत्या न्यूझीलंडने बुधवारी (२९ एप्रिल) त्यांचा संघ जाहीर केला असून त्यामधील तीन खेळाडूंसाठी हा शेवटचा टी२० विश्वचषक असणार आहे, कारण या स्पर्धेनंतर ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहेत. १५ जणींच्या या संघात मागील विश्वचषकातील १० खेळाडूंचा समावेश आहे. आगामी विश्वचषकासाठी संघ जाहीर करणारा न्यूझीलंड दुसरा संघ ठरला असून इंग्लंडने मंगळवारी (२८ एप्रिल) आपला संघ जाहीर केला.
दीर्घकाळ कर्णधारपद भूषवलेल्या सोफी डिव्हाईनकडून नुकतेच नेतृत्वाची जबाबदारी स्विकारलेली स्टार अष्टपैलू खेळाडू मेलि केर विश्वचषकात संघाचे नेतृत्व करणार आहे. संघामध्ये अनुभवी आणि युवा खेळाडूंचा चांगला मेळ आहे. अनुभवी सुझी बेट्स आणि डिव्हाईन त्यांच्या कारकिर्दीतील १० वा टी२० विश्वचषक, तर नेन्सी पटेल आणि इझी शार्प पहिली आयसीसी स्पर्धा खेळण्यास उत्सुक आहेत.
बेट्सने मागील आठवड्यात जाहीर केले की आगामी टी२० विश्वचषक स्पर्धा ही तिच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अखेरची स्पर्धा असेल. न्यूझीलंड संघानेही बुधवारी त्याची पुष्टी केली आहे. १२ जूनपासून सुरू होणारी ही टी२० विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर लिया ताहुहू आणि डिव्हाईन ह्या पण निवृत्त होणार आहेत. ही स्पर्धा इंग्लंड आणि वेस्टमध्ये खेळली जाणार आहे.
न्यूझीलंड गट ब मध्ये असून यामध्ये त्यांच्यासोबत श्रीलंका, वेस्ट इंडिज, आयर्लंड, स्कॉटलंड आणि इंग्लंड यांचा समावेश आहे. न्यूझीलंडचा पहिला सामना १३ जूनला वेस्ट इंडिजविरुद्ध आहे. आपले विजेतेपद कायम राखत दिग्गजांना चांगला निरोप देण्याचा संघाचा प्रयत्न असणार आहे.
“आमचे तीन सर्वात वरिष्ठ खेळाडू एकाच स्पर्धेत आपल्या कारकिर्दीचा शेवट करत आहेत, हा एक दुर्मिळ आणि विशेष प्रसंग आहे,” असे न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक बेन सॉयर यांनी बेट्स, डिव्हाईन आणि ताहुहूबद्दल म्हटले आहे.
टी२० विश्वचषक २०२६ साठी न्यूझीलंडचा संघ – मेली केर (कर्णधार), सुझी बेट्स, सोफी डिव्हाईन, फ्लोरा डेव्हनशायर, इझी गेझ, मॅडी ग्रीन, ब्रुक हॅलिडे, ब्री इलिंग, पॉली इंग्लीस, जेस केर, रोझमेरी मायर, नेन्सी पटेल, जॉर्जिया प्लिमर, इझी शार्प, लीया ताहुहू.






