क्रिकेट सामन्यादरम्यान मैदानावर फलंदाज आणि गोलंदाज यांच्यात चालणारी चढाओढ पाहण्याजोगी असते. त्यातही इंडियन प्रीमियर लीगमध्ये जगभरातील प्रतिभाशाली खेळाडूंना वेचू-वेचू फ्रँचायझी संघात भरती करत असतात. त्यामुळे आयपीएलच्या मैदानावर रंगणाऱ्या फलंदाज आणि गोलंदाज यांच्यातील चढाओढीवरुन तर नजर हटता हटत नाही. जर केवळ फलंदाजांबद्दल बोलायचे झाले, आयपीएलमध्ये बेन स्टोक्स, ख्रिस गेल, मनिष पांडे, शेन वॉटसन अशा फलंदाजांनी त्यांचा दबदबा निर्माण केला आहे.
यात मुंबई इंडियन्स संघाच्या फलंदाजांचाही क्रमांक लागतो. मुंबईकडे वरच्या फळीपासून ते अगदी खालच्या फळीपर्यंत दमदार खेळी करणारे फलंदाज उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांच्या घातक फलंदाजांपुढे भल्या भल्या गोलंदाजांचे माथे झुकतात.
या लेखात आम्ही, आयपीएल २०२०च्या पूर्ण हंगामात मुंबई इंडियन्सकडून सर्वोत्कृष्ट फलंदाजी केलेल्या पाच खेळाडूंचा आढावा घेतला आहे.
आयपीएल २०२०मधील मुंबई इंडियन्सचे पाच सर्वोत्तम फलंदाज –
१) इशान किशन –
गेल्या दोन वर्षांपासून यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्त्व करत आहे. ५.५ कोटी रुपयांना मुंबईने ताफ्यात दाखल केलेला हा खेळाडू २०१८-१९मध्ये जास्त विशेष प्रदर्शन करु शकला नाही. परंतु, यावर्षी त्याच्या फलंदाजीने सर्वत्र कहर माजवला आहे. आतापर्यंत हंगामातील १३ सामन्यात त्याने ४८३ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ४ अर्धशतकांचा समावेश आहे. यासह इशान हा मुंबईकडून यंदा सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी विराजमान आहे.
२) क्विंटन डी कॉक –
आयपीएल २०१९मद्ये मुंबई इंडियन्स संघात दक्षिण आफ्रिकाच्या क्विंटन डी कॉकची भरती करण्यात आली. दक्षिण आफ्रिका संघाच्या नेतृत्त्वाची धुरा सांभाळणाऱ्या या यष्टीरक्षक फलंदाजाकडून मुंबईला खूप अपेक्षा होत्या. डी कॉकनेही मुंबईच्या अपेक्षांवर खरे उतरत गतवर्षी ५००पेक्षा अधिक धावा केल्या. यावर्षीही त्याची फलंदाजी आपला जलवा दाखवताना दिसत आहे. त्याने आतापर्यंतच्या १५ सामन्यात ४ अर्धशतकांसह ४८३ धावा केल्या आहेत. दरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद ७८ इतकी राहिली आहे.
३) सूर्यकुमार यादव –
महाराष्ट्रीय सूर्यकुमार यादव हा रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील मुंबई इंडियन्स संघाचा चेहरा बनला आहे. रोहित दुखापतग्रस्त झाल्यानंतर त्याने स्वबळावर संघाला मिळवून दिलेले एकहाती विजय कुणीही विसरु शकणार नाही. एवढेच नव्हे, तर अतिशय महत्त्वपूर्ण अशा क्वालिफायर १ सामन्याच्या लढतीतही त्याने केवळ ३८ धावांत अर्धशतकी खेळी केली होती.
या हंगामात त्याने आतापर्यंत एकूण १५ सामने खेळले असून ४१.९०च्या सरासरीने ४६१ धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने चार अर्धशतकेही लगावली आहेत.
४) हार्दिक पंड्या –
नेहमी आपल्या जोरदार फटकेबाजीने विरुद्ध संघाची सळो की पळो करुन सोडणारा हार्दिक पंड्या सुरुवातीच्या काही सामन्यात विशेष प्रदर्शन करु शकला नाही. परंतु, काही कालावधीनंतर फॉर्ममध्ये आल्यावर हार्दिकची बॅट शांत बसणाऱ्यातील नव्हती. त्याने या हंगामात अद्याप १३ सामने खेळले आहेत. ज्यात त्याने १४ चौकार आणि २५ षटकारांच्या मदतीने २७८ धावा केल्या आहेत.
५) रोहित शर्मा –
मुंबई इंडियन्सला सर्वाधिकवेळा जेतेपद मिळवून देणाऱ्या रोहित शर्माला यावर्षी दुखापतीमुळे बऱ्याच सामन्यांना मुकावे लागले. तरीही रोहितने २०० धावांचा आकडा पार केला आहे. त्याने आतापर्यंत ११ सामने खेळले असून २ अर्धशतकांच्या मदतीने २६४ धावा केल्या आहेत. दरम्यान साखळी फेरीतील कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात त्याने केलेली ८० धावांची ताबडतोब खेळी कोणताही चाहता विसरु शकणार नाही.
ट्रेंडिंग लेख-
चौथी शिकलेल्या पोराच्या फिरकीपुढे भल्याभल्यांनी घेतलीये गिरकी; वाचा मुंबईच्या प्रमुख फिरकीपटूबद्दल
प्रतिस्पर्ध्याला दिवसा चांदणं दाखवणारा दिल्लीचा हा पठ्ठ्या म्हणजे दिल्ली कॅपिटल्सची जान आहे जान !!
महत्त्वाच्या बातम्या-
IPL FINAL : धवन, पंत, हेटमायर सारख्या डावखुऱ्या फलंदाजांसाठी मुंबई ‘हा’ गोलंदाज उतरवणार मैदानात
IPL – फायनलपूर्वी सचिन तेंडुलकरचा मुंबईला खास संदेश, प्रत्येक खेळाडूला ‘ही’ गोष्ट समजायला हवी
मुंबईकरांनो, ‘या’ पाच दिल्लीकरांपासून सावधान !