तिरुअनंतरपुरम। भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात रविवारी(8 डिसेंबर) दुसरा टी20 सामना पार पडला. ग्रिनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजने 8 विकेट्सने विजय मिळवला.
या सामन्यात वेस्ट इंडिजचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश रामदिनचा 11 जणांच्या संघात समावेश करण्यात आला नव्हता. मात्र तरी त्याने त्याने एका चार वर्षाच्या मुलीला खास भेट देत अनेक चाहत्यांचे मन जिंकले आहे.
झाले असे की जेव्हा वेस्ट इंडिजचा संघ हा सामना खेळण्यासाठी स्टेडियममध्ये येत होता त्यावेळी एका चार वर्षीय मुलीला संघाकडे पाहून हात हलवताना रामदिनने पाहिले. त्यामुळे तो तिच्याजवळ गेला आणि त्या मुलीला भेटून त्याने तिला सामन्याचे तिकीट भेट दिले. रामदिन भेटल्यानंतर त्या चार वर्षीय चिमुकलीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
या क्षणांचे फोटो वेस्ट इंडिजने ट्विटरवर शेअर केले आहेत. तसेच या फोटोंना कॅप्शन दिले आहे की ‘आज इंटरनेटवरील कदाचित हे सर्वांत गोंडस फोटो असतील. दुसऱ्या टी20 सामन्यासाठी जाताना दिनेश रामदिनने थांबून एका चार वर्षाच्या गोंडस चाहतीला तिकीट आणि भेट दिली.’
https://twitter.com/windiescricket/status/1203634340858601472
या सामन्यात भारताने शिवम दुबेच्या 54 धावांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 170 धावा केल्या होत्या आणि वेस्ट इंडिजला 171 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हाना पाठलाग वेस्ट इंडिजने 18.3 षटकात 2 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केला.






