सनरायझरर्स हैदराबादचा माजी कर्णधार आणि आक्रमक फलंदाज डेविड वॉर्नर याने हैदराबादच्या चाहत्यांसाठी एक भावनिक संदेश देखील लिहिला आहे. हैदराबादने २०२१ आयपीएल हंगामातील अखेरचा सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध शुक्रवारी (८ ऑक्टोबर) खेळला. ज्यात त्यांना ४२ धावांनी पराभव स्विकारावा लागला. या हंगामात हैदराबाद तळाच्या क्रमांकावर राहिला.
डेविड वॉर्नरने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘अविस्मरणीय आठवणी दिल्याबद्दल सर्वांचे आभार. आमच्या संघाच्या सतत मागे उभे राहून प्रोत्साहन देणाऱ्या चाहत्यांचे आभार. तुम्ही दिलेल्या पाठिंब्यासाठी माझे आभाराचे दोन शब्दही कमी पडतील. हा सुखमयी प्रवास होता. मी आणि माझे कुटुंबीय तुम्हाला आमच्या आठवणीत कायम ठेवू.’
आपल्या खराब फॉर्मशी झगडणाऱ्या वॉर्नरला या हंगामाच्या अर्ध्यावरच कर्णधारपद सोडावे लागले होते. त्यांनंतर त्याला प्लेइंग इलेव्हनमधील जागेसाठी देखील झगडावे लागले होते. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातही तो विशेष कामगिरी करू न शकल्याने त्यास प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर जावे लागले. त्यांनंतर चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळलेल्या सामन्यात डेविड वॉर्नरचा संघात समावेश झाला नव्हता.
संघाच्या डगआऊटमध्येही वॉर्नर दिसत नसल्याने तर चर्चांना उधाण आले होते. वॉर्नर सामन्यादरम्यान हॉटेलच्या खोलीत थांबला आणि तेथूनच टीव्हीवर सामना पाहिला. त्याची इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करताना वॉर्नरने लिहिले होते, तुमच्या समोर कोण खरा आहे हे महत्त्वाचे नाही, तुमच्या पाठीमागे कोण आहे हे महत्त्वाचे आहे. यासोबत वॉर्नरने एक छोटा व्हिडीओही शेअर केला होता, ज्यात तो टीव्हीवर हैदराबादच्या संघाला चीअर करताना दिसत होता. यानंतरच डेविड वॉर्नर हैदराबाद संघ सोडणार असल्याच्या चर्चेने जोर धरला होता.
त्याचबरोबर हैदराबादचे मुख्य प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस म्हणाले होते, ‘आम्ही आता अंतिम फेरी गाठू शकणार नाही, म्हणून आम्ही जास्तीत जास्त युवा क्रिकेटपटूंना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. युवा क्रिकेटपटूंना केवळ मैदानावरच नाही तर सेटअपमध्ये देखील जास्तीत जास्त संधी मिळतील. म्हणूनच हा निर्णय घेण्यात आला आणि डेविड वॉर्नर हा एकमेव अनुभवी खेळाडू नव्हता जो हॉटेलमध्ये राहिला होता. आमच्याकडे बरेच युवा खेळाडू आहेत जे अद्याप मैदानावर आलेलेच नाहीत, अगदी राखीव म्हणूनही नाही. आम्हाला त्यांना संधी द्यायची होती, आमची हीच योजना येत्या सामन्यांमध्येही दिसून येईल.’
डेविड वॉर्नरने आयपीएल २०२१ मध्ये खेळलेल्या ८ सामन्यांत १०७.७३ च्या स्ट्राईक रेटने फक्त १९५ धावा केल्या आहेत. या दरम्यान, त्याने दोन अर्धशतके केली आहेत. वॉर्नरने हैदराबाद संघाचे पाच वर्षे नेतृत्व केले होते आणि २०१६ मध्ये संघाला जेतेपद देखील मिळवून दिले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषकाच्या भारतीय संघात बदल होण्याची शक्यता; विराट-रोहित बीसीसीआयच्या बैठकीत होणार सामील
ईशान-सूर्यकुमारचा डबल धमाका! ४ वर्षांपूर्वीच्या सुनील नरेन-ख्रिस लिनच्या विक्रमाची केली बरोबरी
टी२० विश्वचषकात खेळाडू कोरोना संक्रमित आढळल्यास काय होणार? वाचा काय आहेत आयसीसीचे नियम