ऑस्ट्रेलियाने गुरुवारी (११ नोव्हेंबर) दुसऱ्या उपांत्य फेरीत पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव केला आणि दुसऱ्यांदा टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २० षटकांत ४ बाद १७६ धावा केल्या. यानंतर ऑस्ट्रेलिया संघाने एक षटक शिल्लक असताना पाच गडी गमावून लक्ष्य गाठले. डेविड वॉर्नरने ४९ धावांची जलद खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने नो बॉलवर मारलेला षटकार चर्चेचा विषय ठरला.
टी२० विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या डावादरम्यान, वॉर्नर चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या आठव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मोहम्मद हाफिजच्या हातून चेंडू सुटला आणि चेंडू दोन टप्पे खात डेविड वॉर्नरकडे गेला. वॉर्नरने क्षणाचा विलंब न लावता चेंडूला सीमारेषेबाहेर पाठवले.
वॉर्नरला माहित होते की, हा चेंडू नो-बॉल असेल आणि त्याने त्याचा पुरेपूर फायदा घेतला. हे पाहून समालोचकही हसू लागले. या क्षणाचा व्हिडिओ आयसीसीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. डेविड वॉर्नरने ३० चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४९ करत बाद झाला. त्याची विकेट शादाब खानच्या खात्यात गेली.
https://www.instagram.com/p/CWJH91RIdn1/
या सामन्यात सलामीवीर मोहम्मद रिझवान आणि फखर जमानच्या अर्धशतकांनी पाकिस्तानला ४ बाद १७६ अशी भक्कम धावसंख्या उभारून दिली. रिझवानने ५२ चेंडूत ३ चौकार आणि चार षटकारांसह ६७ धावा केल्या. कर्णधार बाबर आझम ३४ चेंडूत ३९ धावा केल्या. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केली. फखर जमानने ३२ चेंडूत नाबाद ५५ केल्या. त्याने आपल्या डावात तीन चौकार आणि चार षटकार ठोकले.
ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने चार षटकांत ४९ धावा दिल्या. ऑस्ट्रेलियाचे दोन्ही फिरकीपटू ऍडम झाम्पा (२२ धावांत १ विकेट) आणि ग्लेन मॅक्सवेल (तीन षटकांत २० धावा) यांनी चांगली गोलंदाजी केली. मिशेल स्टार्क (३८ धावांत २ विकेट) आणि पॅट कमिन्स (३० धावांत १ विकेट) यांनीही चांगली गोलंदाजी करत संघाच्या विजयात हातभार लावला.
यानंतर फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियाकडून वॉर्नरने ४९ धावांची खेळी केली. तसेच अखेरच्या ५ षटकांत तुफानी फलंदाजी करताना मार्कस स्टॉयनिसने नाबाद ४० आणि मॅथ्यू वेडने नाबाद ४१ धावांची खेळी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने १७७ धावांचे आव्हान ५ विकेट्सच्या मोबदल्यात १९ षटकांत पूर्ण केले. पाकिस्तानकडून शादाब खानने ४ विकेट्स घेतल्या, तसेच शाहीन आफ्रिदीने १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
पराभव पचेना! पाकिस्तान ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमीफायनल हारला आणि दु:खात चाहता दुबईच्या मैदानातच झोपला
फखर जमानच्या ‘बुलेट’ शॉटपासून थोडक्यात वाचले पंच, नाहीतर घडली असती दुर्घटना; बघा थरारक व्हिडिओ
Video: मॅथ्यू वेडचे ‘ते’ ३ सलग षटकार, ज्यामुळे पाकिस्तानच्या हातून निसटले फायनलचे तिकीट