---Advertisement---

न्यूझीलंड संघाला मोठा धक्का, ‘हा’ मॅच विनर खेळाडू टी२० विश्वचषक फायनलसहित भारत दौऱ्यातूनही बाहेर

On: शुक्रवार, नोव्हेंबर 12, 2021 7:32 AM
---Advertisement---

आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. नुकतेच या स्पर्धेतील उपांत्य फेरी सामने संपले असून रविवार रोजी (१४ नोव्हेंबर) न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघांमध्ये अंतिम सामना रंगणार आहे. तत्पूर्वी टी२० विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम सामन्यात प्रवेश करणाऱ्या न्यूझीलंड संघाला मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा विस्फोटक फलंदाज डेवॉन कॉन्वे हा टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातून बाहेर झाला आहे. याबरोबरच तो भारत दौऱ्यालाही मुकणार आहे. कॉन्वेच्या उजव्या हाताला दुखापत झाल्यामुळे तो या महत्त्वपूर्ण सामन्यांमधून बाहेर झाला आहे.

न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड यांच्यात बुधवार (१० नोव्हेंबर) रोजी अबु धाबीत झालेल्या उपांत्य फेरी सामन्यादरम्यान कॉन्वेला ही दुखापत झाली आहे. या सामन्यात त्याने ३८ चेंडूंमध्ये ४६ धावांची खेळी केली होती. अर्धशतकाच्या जवळ असताना इंग्लंडच्या लियाम लिविंगस्टोनने त्याला झेलबाद केले होते. बाद झाल्यानंतर स्वत:च्याच बॅटला त्याचा उजवा हात धडकल्याने तो जखमी झाला आहे. गुरुवारी त्याच्या हाताचा एक्स रे रिपोर्ट आला असून यामध्ये त्याच्या हाताचे एक बोट तुटले असल्याची पुष्टी झाली आहे.

अंतिम सामन्यापूर्वी कॉन्वेसारख्या फलंदाजाचे बाहेर होणे हा न्यूझीलंड संघासाठी मोठा झटका आहे. याविषयी बोलताना न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टीड म्हणाले की, “कॉन्वे अशावेळी अशाप्रकारे बाहेर होणे अत्यंत निराशादायी आहे. त्याच्यामध्ये क्रिकेटप्रती वेगळाच उत्साह आहे आणि ऐन मोक्याच्या वेळी त्याच्या संघाबाहेर होण्याच्या दु:खाइतके मोठे दु:ख कोणते नाही.”

“मैदानावर त्याची दुखापत इतकी गंभीर असल्याचे वाटले नव्हते. परंतु तो इतक्या गंभीररित्या जखमी होणे दुर्देवी आहे. कॉन्वे हा एक शानदार संघ सहकारी आहे आणि संघातील लोकप्रिय सदस्यांपैकी एक आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण त्याच्यासाठी दु:खी आहोत. तो दुखापतीतून सावरण्यासाठी घरी जाण्याआधी इथे राहून संघाचे समर्थन करणार आहे,” असेही ते म्हणाले.

कॉन्वेच्या पर्यायी खेळाडूविषयी बोलताना प्रशिक्षक स्टीड म्हणाले की, “वेळेच्या कमतरतेमुळे आम्ही टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना किंवा भारताविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी त्याच्या पर्यायी खेळाडूचा शोध घेणार नाही. परंतु नोव्हेंबरअंती होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी आम्ही त्याच्या पर्यायी खेळाडूचा शोध घेण्यासाठी प्रयत्नशील असू.”

महत्त्वाच्या बातम्या-

टी२० विश्वचषक: तीन वेळा सेमीफायनलमध्ये हारणारा पाकिस्तान एकमेव संघ, पाहा यापूर्वी केधी केलीय ‘ही’ नकोशी कामगिरी

पाकिस्तानला पराभूत करत ऑस्ट्रेलियाने अंतिम सामना गाठल्यानंतर क्रिकेटविश्वातून ट्विटवर प्रतिक्रियांचा पाऊस

सेम टू सेम! टी२० विश्वचषकाच्या दोन्ही उपांत्य सामन्यांत होते ‘हे’ साम्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---