भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात १८ ते २२ जून दरम्यान साऊथॅम्पटन येथे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना पार पडणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. लवकरच दोन्ही संघ इंग्लंडचा दौराही करणार आहेत. दरम्यान, या सामन्यासाठी न्यूझीलंडचा फलंदाज डेवॉन कॉनवे अनोख्या पद्धतीने सराव करत आहे.
न्यूझीलंड संघ भारताविरुद्ध कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यापूर्वी इंग्लंडविरुद्ध २ जूनपासून २ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या सामन्यांपूर्वी कॉनवे खेळपट्टीवर कचरा पसरवून सराव करत आहे. कारण त्याला अपेक्षित आहे की यामुळे भारतीय फिककीपटूंविरुद्ध खेळण्यास मदत होईल.
कॉनवेने अजून कसोटी पदार्पण केलेले नाही. पण त्याला इंग्लंड दौऱ्यात कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. खेळपट्टीवर कचरा पसरवून सराव करण्यामुळे वेगाने वळण घेणाऱ्या चेंडूविरुद्ध खेळण्यास मदत होईल, असे त्याला वाटत आहे. विशेषत: साऊथॅम्पटनमध्ये फुटमार्कमुळे चेंडू फिरकी घेऊ शकतो, त्यामुळे अशा चेंडूंचा सामना करण्यासाठी तो आधीच तयारी करत आहे.
तो म्हणाला, ‘फिरकी गोलंदाजी खेळणे सोपे नसते. पण जर तुम्ही एक योजना आधीच तयार केली असेल, तर तुम्ही सामन्यात चांगले प्रदर्शन करु शकाल.’
कॉनवेची कारकिर्द
कॉनवेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३ वनडे आणि १४ टी२० सामने खेळले आहेत. त्याने वनडेत १ शतक आणि १ अर्धशतकासह २२५ धावा केल्या आहेत. तसेच त्याने आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये ५९.१२ च्या सरासरीने ४ अर्धशतकांसह ४७३ धावा केल्या आहेत. त्याची नजीकच्या काळातील कामगिरी पाहाता न्यूझीलंडने त्याला खेळाडूंच्या वार्षिक मानधन कराराच्या यादीत स्थानही दिले आहे.
कॉनवेने १०८ प्रथम श्रेणी सामने देखील खेळले असून यामध्ये त्याने ४७.२१ च्या सरासरीने १८ शतके आणि ३२ अर्धशतकांसह ७१३० धावा केल्या आहेत. तसेच त्याने ८४ अ दर्जाच्या क्रिकेट सामन्यांमध्ये ३३२९ धावा केल्या आहेत. तर ९४ टी२० क्रिकेट सामन्यांमध्ये त्याने ३१४९ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
मानलं भावा! इंग्लंडमध्ये राहून कोरोना रूग्णांसाठी झटतोय हनुमा विहारी, वाचा सविस्तर
आजच्याच दिवशी क्रिकेटचा महामेरु सचिनचे झाले होते आयपीएल पदार्पण, ‘अशी’ राहिली त्याची कारकिर्द






