मुंबईमध्ये प्रो कबड्डीच्या ८ व्या हंगामाचा तीन दिवसीय लिलाव पार पडला. डिसेंबर २०२१ पासून प्रो कबड्डीच्या ८ व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी २९,३० आणि ३१ ऑगस्ट रोजी खेळाडूंचा लिलाव आयोजित करण्यात आला होता. या लिलावादरम्यान अनेक मोठ्या खेळाडूंवर बोली लागली. या लिलावात ४६ वर्षीय धर्मराज चेरलाथनचाही समावेश होता. यावेळी त्याला जयपूर पिंक पँथर्सने खरेदी केले. त्यामुळे त्याच्या नावावर एक विक्रम झाला आहे.
पीकेएल ८ मध्ये चेरलाथन करणार जयपूरचे प्रतिनिधित्व
दिग्गज डिफेंडर धर्मराज चेरलाथनला पीकेएलच्या ८ व्या हंगामासाठी अभिषेक बच्चन यांची मालकी असलेल्या जयपूर पिंक पँथर्सने खरेदी केले आहे. त्याच्यासाठी २० लाखांची किंमत जयपूरने मोजली. चेरलाथन जयपूरचे पहिल्यांदाच प्रतिनिधित्व करणार आहे. विशेष म्हणजे हा त्याचा प्रो कबड्डीमधील एकूण ७ वा संघ ठरला आहे.
सात संघांचे प्रतिनिधित्व करणारा पहिला खेळाडू
चेरलाथनला जयपूरने खरेदी केल्यानो तो प्रो कबड्डीमध्ये ७ संघांचा भाग होणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे. चेरलाथनने यापूर्वी बंगळुरु बुल्स, तेलुगु टायटन्स, पटना पायरेट्स, पुणेरी पलटन, यु मुम्बा आणि हरियाणा स्टिलर्स या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.
त्याने प्रो कबड्डीमध्ये कारकिर्दीची सुरुवात बंगळुरु बुल्स संघाकडून केली होती. त्याने पहिले दोन हंगाम याच संघाकडून खेळले. तसेच त्याने दुसऱ्या हंगामात ४२ टॅकल पाँइंट्स मिळवत बंगळुरुला अंतिम सामन्यापर्यंत नेण्यात मोलाचा वाटा उचलला होता. त्यानंतर तो तिसऱ्या हंगामात तेलुगु टायटन्सकडून खेळला.
यानंतर चौथ्या हंगामात त्याने पटना पायरेट्सने प्रतिनिधित्त्व करण्याबरोबरच या संघाच्या नेतृत्वाची धूराही सांभाळली. एवढेच नाही तर संघाला सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवून दिले. पाचव्या हंगामात चेरलाथनने पुणेरी पटलनचे प्रतिनिधित्व केले, तर सहाव्या हंगामात तो यु मुम्बाकडून खेळला.
सातव्या हंगामात त्याला हरियाणा स्टिलर्सने कर्णधार केले. त्यावेळी तो प्रशिक्षक राकेश कुमारच्या मार्गदर्शनाखाली खेळला. राकेश आणि तो त्यापूर्वी भारतीय रेल्वेकडून एकत्र खेळले होते.
चेरलाथनची कारकिर्द –
चेरलाथन २०१६ साली कबड्डी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता. त्याच्याकडे लेफ्ट आणि राईट, अशा दोन्ही कॉर्नरकडून खेळण्याची क्षमता आहे. त्याने प्रो कबड्डीमध्ये आत्तापर्यंत २५९ टॅकल पाँइंट्स मिळवले असून त्याच्या नावावर १२ हाय-फाईव्ह आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
प्रो कबड्डी लिलावाची सांगता; सिद्धार्थ, गिरिश, रिशांकसह ‘या’ महाराष्ट्रीयन कबड्डीपटूंवर लागली बोली