आयपीएल २०२२ सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जाला चार वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकवून देणाऱ्या महेंद्रसिंग धोनी याने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. गुरुवारी (२४ मार्च) धोनीने सीएसकेचे कर्णधारपद सोडले. रवींद्र जडेजा आता सीएसकेचे नेतृत्व करणार आहे. त्याच्या या निर्यणामुळे चाहते हैराण झाले आहेत, कारण त्याविषयी त्याने कसलीही पूर्वकल्पना दिली नव्हती. तसे पाहिले, तर ही पहिली वेळ नाहीय, जेव्हा धोनीने चाहत्यांना अशा प्रकारे आश्चर्यचकित केले आहे. यापूर्वी ७ वेळा असाच प्रसंग घडला आहे, जेव्हा चाहत्यांना त्याने अचानक मोठे निर्णय कळवले आहेत.
धोनीने चाहत्यांना अचानकपणे कळवलेले ७ मोठे निर्णय
देहराडुनमध्ये साक्षीसोबत विवाह
भारतीय संघाचा कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याने सर्वप्रथम ४ जुलै २०१० मध्ये चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली, ती देखील अचानकपणे. त्या दिवशी धोनी आणि साक्षी यांचा देहराडुनमध्ये विवाह पार पडला होता. धोनीच्या लग्नाची माहिती चाहत्यांना तर लांब, पण संघातील सहकारी खेळाडूंनाही नव्हती. धोनीने त्याचा लहानपणीचा मित्र सीमांत लोहानीला अचानकपणे दिल्लीला बोलावले. त्यानंतर धोनी त्याला देहराडुनला घेऊन गेला, ज्याठिकाणी सीमांतला त्यांच्या लग्नाची माहिती मिळाली.
२०११ विश्वचषक जिंकल्यानंतर काढले डोक्यावरचे सर्व केस
धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने अनेक महत्वाच्या मालिका जिंकल्या. परंतु २००७ आणि २०११ विश्वचषकातील विजय हा सर्व भारतीयांसाठी अविस्मरणीय आहे. धोनीच्याच नेतृत्वात भारताने हे दोन्ही विश्वचषक जिंकले आहेत. या दोन्ही महत्वाच्या विजयानंतर धोनीने स्वतःची केशरचना बदलली होती. २००७ टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर धोनीने त्याचे लांब केल कापून लहान केले होते. तसेच २०११ विश्वचषक जिंकल्यानंतर त्याने डोक्यावरील सर्व केस काढून टाकले होते. पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ धोनीच्या केसांचे चाहते होते आणि २००७ विश्वचषकावेळी त्यांनी धोनीला केस न कापण्याचा सल्ला दिला होता.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अचानक घेतली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती
भारतीय संघ २०१४ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यात धोनीने एका मोठ्या निर्णयाची घोषणा केली, जो ऐकूण त्याचा प्रत्येक चाहता आणि संघातील खेळाडूही हैराण झाले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान धोनीने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली. विशेष म्हणजे त्याने स्वतः या निर्णयाची माहिती दिली नाही, तर बीसीसीआयकडून याविषयी माहिती दिली गेली.
२०१७ मध्ये सोडले भारतीय संघाचे कर्णधारपद
कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तीन वर्षांनी म्हणजेच २०१७ मध्ये धोनीने अचानक क्रिकेटच्या इतर दोन्ही प्रकारांमधील कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. त्यानंतर विराट कोहलीने भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबादारी स्वतःच्या खांद्यावर घेतली.
सोशल मीडियावर केली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर पुढचे ६ वर्ष धोनी मर्यादित षटकांमध्ये संघासोबत खेळत राहिला आणि १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. धोनीने अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून त्याच्या निवृत्तीची माहिती दिली होती.
टी२० विश्वचषकात बनला भारतीय संघाचा मेंटॉर
धोनीने २०२१ मध्ये आयसीसी टी२० विश्वचषकादरम्यान भारतीय चाहत्यांना एक आनंदाचा झटका दिला होता. यावर्षीचा विश्वचषक यूएई आणि ओमानमध्ये आयोजित केला गेला होता. एमएस धोनीला टी२० विश्वचषाकसाठी संघात निवडले गेले होते. भारतीय संघात धोनीचे नाव पाहून चाहते खूपच आनंदी झाले होते. धोनीने टी-२० विश्वचषकादरम्यान भारतीय संघाच्या मेंटॉरची भूमिका पार पाडली होती आणि यासाठी त्याने कसल्याही प्रकारचा मोबदला घेतला नव्हता.