आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चौकार- षटकारांचा पाऊस पाडणारा भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी शेतीकडे वळला आहे. धोनीने काही काळापूर्वी धुर्वा सेंबो येथील फार्म हाऊसमध्ये शेती आणि डेअरीचे काम सुरू केले होते. आता तिथे मोठ्या प्रमाणावर फळभाज्यांचे उत्पादन घेतले जात आहे. याव्यतिरिक्त दुधाचे उत्पादनही होत आहे. ईजा फॉर्म या ब्रँडमार्फत उत्पादनांची विक्री केली जात आहे. सोमवारपासून (२२ नोव्हेंबर) टोमॅटो आणि दूधाची विक्री सुरू झाली आहे. यांच्या किंमतीही समोर आल्या आहेत. तरीही, धोनी सध्या कुटुंबासह दुबईत आहे.
धोनीच्या धुर्वा सेंबो येथील फार्म हाऊसमधील सेंद्रिय भाज्या बाजारात मिळत आहेत. आता मार्केटमध्ये केवळ टोमॅटो आणि दूधाची विक्री होत आहे. बाजारात टोमॅटो ४० रुपये किलो विकले जात आहेत. पहिल्याच दिवशी ८० किलो टोमॅटोपैकी ७१ किलो टोमॅटो विकले आहेत. २० दिवसांंनी कोबी, सोयाबीनचे, फुलकोबी देखील बाजारात येण्याचे सांगितले जात आहे. सोबतच इथे स्ट्रॉबेरी आणि ब्रोकोली यांचीही शेती होत आहे.
धोनीच्या फार्ममध्ये उगवलेल्या भाज्यांचे मार्केटिंग शिवनंदन सांभाळत आहेत. त्यांनी म्हटले की, “धोनीने काही दिवसांपूर्वी आम्हाला भेटायला बोलावले आणि म्हटले ‘फार्ममध्ये भाज्या आणि दुधाचेही उत्पादन होत आहे. याची मार्केटिंग करायची आहे.’ यानंतर करार निश्चित झाला आणि भाज्यांची विक्री सुरू झाली.”
शिवनंदन यांनी पुढे म्हटले की, “दूध ५५ रुपये लीटरच्या भावात विकले जात आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे मिश्रण नाही. पंजाबमधून ६० गायी आणल्या होत्या. जर्सी आणि सहिवाल या जातीच्या गायींचे दूध बाजारात विकले जात आहे. आता अपर बाजार, लालपूर, वर्धमान कंपाऊंडमध्ये याची विक्री होत आहे. याव्यतिरिक्त पीपी कंपाऊंडमध्येही लवकरच काऊंटर खोलले जातील.”
कुक्कुटपालन व्यवसायातही धोनी
याव्यतिरिक्त धोनीने कुक्कुटपाल व्यवसायातही उडी घेतली आहे. त्याने झाबुआच्या कुक्कुटपालन सहकारी संस्थेच्या विनोद मेडाकडे कडकनाथच्या दोन हजार पिल्लांची मागणी केली होती. धोनीने यासाठी आधीच एक लाख रुपये संस्थेत जमा केले होते. विनोद 15 डिसेंबर रोजी धोनीच्या फार्म हाऊसवर या कोंबड्यांची पिल्ले पोहोचवण्यासाठी जाणार आहे.
आयपीएलमधील कामगिरी
नुकत्याच संपलेल्या आयपीएल २०२० मध्ये धोनीला फार चांगली कामगिरी करता आली नाही. त्याने चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून १४ सामने खेळताना २५ च्या सरासरीने २०० धावा केल्या. त्याला आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच आपल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला प्ले- ऑफमध्ये नेता आले नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
शेतीनंतर आता धोनी कुक्कुटपालन व्यवसायात; ‘या’ खास कोंबड्यांचा करणार व्यापार
व्हिडीओ- अखेर क्रिकेटपासून दूर असलेल्या धोनीने सुरु केली ऑरगॅनिक शेती, ट्रॅक्टरने केली…
आयपीएलमधला ‘हा’ स्टार खेळाडू करतोय आज उत्तर प्रदेशमध्ये शेती