---Advertisement---

“टी२० विश्वचषकात खेळायचे असेल तर धोनीने आणखी सामने खेळावे”

On: शनिवार, फेब्रुवारी 29, 2020 5:00 PM
---Advertisement---

येत्या 29 मार्चपासून आयपीएलच्या 13व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. यासाठी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी 2 मार्चपासून चेन्नईमध्ये सरावाला सुरुवात करणार आहे. आयपीएलमधून धोनी पुन्हा क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. धोनीने 2019 विश्वचषकानंतर क्रिकेट सामने खेळलेले नाही

पण असे असले तरी भारताचे महान क्रिकेटपटू कपिल देव (Kapil Dev) हे धोनीच्या आयपीएलमधील पुनरागमनाबद्दल उत्सुक नाहीत. कपिल यांचे म्हणणे असे आहे की, ‘ही लीग भविष्यातील युवा खेळाडूंसाठी आहे. त्यामुळे भारताच्या टी20 विश्वचषक (T20 World Cup) संघात निवड होण्यासाठी धोनीने आणखी काही सामने खेळायला हवेत.’

गतवर्षी झालेल्या वनडे विश्वचषकानंतर धोनीच्या क्रिकेट कारकीर्दीबाबत अनेकदा चर्चा झाली आहे. तसेच धोनीला जानेवारी महिन्यात जाहीर झालेल्या बीसीसीआयच्या वार्षिक मानधन करारातील खेळाडूंच्या यादीतूनही वगळण्यात आले होते.

“धोनीचा चाहता म्हणून त्याला टी20 विश्वचषकात खेळताना पाहू इच्छित आहे. मात्र, क्रिकेटपटू म्हणून मला असे वाटते की, हे सर्व व्यवस्थापनावर निर्भर करते. धोनीने जवळ जवळ 1 वर्षापासून क्रिकेट खेळलेले नाही. त्याला भारतीय टी20 विश्वचषक संघात येण्यासाठी आणखी सामने खेळण्याची गरज आहे. वेगवेगळ्या खेळाडूंसाठी वेगवेगळे मापदंड असायला नकोत,” असे कपिल देव एका कार्यक्रमावेळी म्हणाले.

धोनाविषयी बोलताना कपिल पुढे म्हणाले, “तो त्याच्या क्रिकेट कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यावर आहे. तसेच, मी धोनीचा चाहता असल्यामुळे त्याला खेळताना पाहायला मला आवडेल. पण, आयपीएलमध्ये मला पुढच्या पिढीतील खेळाडूंनाच खेळताना पाहायचे आहे.”

याचबरोबर कपिल यांना सध्याच्या न्यूझीलंड दौऱ्यात खेळणाऱ्या भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या फॉर्मबद्दलही काळजी वाटत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

“दुखापतीतून बरे होण्यासाठी शरीराला थोडा वेळ लागतो. मात्र, ज्या खेळाडूने पुर्वी मोठी कामगिरी केली असेल त्या खेळाडूला परत चांगली खेळी करण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही.” असे ते बुमराहविषयी बोलताना म्हणाले.

तसेच ते पुढे म्हणाले की, “फलंदाजांना त्यांच्या फॉर्ममध्ये परत येण्यासाठी एक डाव खेळण्याची आणि गोलंदाजांना एका चांगल्या स्पेलची आवश्यकता असते. त्यांना परत फॉर्ममध्ये येण्यासाठी काही विकेट्स घेण्याचीही गरज असते.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---