ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या महिला टी२० विश्वचषकात भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. या विश्वचषकात आज(५ मार्च) भारतीय महिला विरुद्ध इंग्लंड महिला संघात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर पहिला उपांत्य सामना रंगणार होता. मात्र हा सामना नाणेफेकही न होता पावसामुळे रद्द झाला आहे.
त्यामुळे आयसीसीच्या नियमानुसार साखळी फेरीनंतर अ गटात अव्वल क्रमांकावर असणाऱ्या भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. मात्र यामुळे इंग्लंडचे महिला टी२० विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे.
हा सामना रद्द झाल्यानंतर इंग्लंडची कर्णधार हिदर नाईटने म्हटले आहे की आम्हाच्या अपेक्षेप्रमाणे या विश्वचषकाच्या प्रवासाचा अंत झाला नाही. तसेच तिने भविष्यात अशा परिस्थितीत राखीव दिवस असावा असेही म्हटले आहे.
ती म्हणाली, ‘हे निराशाजनक आहे, विश्वचषकाचा प्रवास अशाप्रकारे संपू नये अशी इच्छा होती. पण याबद्दल आपण काहीही करु शकत नाही. कदाचित राखीव दिवस असता तर बरे झाले असते. दक्षिण आफ्रिके विरुद्धचा पराभव आम्हाला आज भोवला. आमचे लक्ष्य उपांत्य फेरी गाठणे हे होते, आणि ते आम्ही पूर्ण केले. पण ही स्थिती जवळजवळ संपूर्ण इंग्लंडसारखीच आहे, हवामानामुळे स्पर्धेतून बाहेर पडणे.’
पुढे नाईट म्हणाली, ‘आम्ही पहिला सामना पराभूत झाल्यानंतर चांगली लय मिळवली होती आणि आजच्या उपांत्य सामन्यासाठीही आम्ही तयार होतो. साराह ग्लेन, सोफी इक्लेस्टोन यांनी चांगली कामगिरी केली होती. मॅडीनेही चांगला खेळ केला. स्पर्धेची सुरुवात चांगली न होणे ही आमच्यासाठी चिंतेची गोष्ट आहे.’ याबरोबरच उपहासात्मकतेने बोलताना नाईट म्हणाली, आम्हाला पहिला सामना जिंकण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल.
इंग्लंडने ब गटातील साखळी फेरीचे ४ पैकी ३ सामने जिंकले होते. त्यांना दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या पहिल्या सामन्यात पराभव स्विकारावा लागला होता. त्यानंतरचे त्यांनी सर्व ३ सामने जिंकले होते. पण १ पराभवामुळे त्यांना ब गटाच्या गुणतालिकेत दक्षिण आफ्रिकेपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर रहावे लागले. त्याचाच फटका आज त्यांना बसला आहे.
कारण आयसीसीच्या नियमानुसार जर उपांत्य फेरीच्या सामन्यात पावसाचा व्यत्यय येऊन सामना रद्द झाला तर साखळी फेरीनंतर गुणतालिकेत अव्वल क्रमांक मिळवणाऱ्या संघाला अंतिम सामन्यात प्रवेश मिळेल.
ब गटाच्या गुणतालिकेत दक्षिण आफ्रिकेचा संघ ३ विजय आणि १ सामना पावसामुळे रद्द झाल्याने ७ गुणांसह अव्वल क्रमांकावर होता. तर इंग्लंड ३ विजय आणि १ पराभवासह ६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिला.
महत्त्वाच्या बातम्या-
–टीम इंडियाने फायनलमध्ये प्रवेश केल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली…
–फायनलमध्ये प्रवेश केलेल्या टीम इंडियाची ७ टी२० विश्वचषकातील अशी आहे कामगिरी
–मोठ मोठे क्रिकेटपटूही विचारात पडले पण कारनामा तर पोलार्डने केला