क्रिकेटपटू आणि त्यांच्या प्रेम कहाण्या क्रिकेट चाहत्यांना नव्या नाही. सचिन-अंजली, विराट-अनुष्का, साक्षी-धोनीच्या प्रेम कहाणीचे अनेक किस्से अनेकदा ऐकायला मिळतात. मात्र एक खास प्रेम कहाणी चाहत्यांच्या नजरे आड राहिली ती म्हणजे दिनेश कार्तिक आणि त्याची पत्नी दीपिका पल्लिकल यांची. हे दाम्पत्या नुकतेच जुळ्या मुलांचे आई-बाबा झाले आहेत.
दिनेश आणि दीपिकाची प्रेम कहाणी खूप सुंदर आहे. सन २०१२ पासून त्यांच्या प्रेम कहाणीला सुरुवात झाली. जेव्हा भारताची दिग्गज स्क्वॉशपटू असलेल्या दीपिका पल्लिकलला दिनेश कार्तिकचा मेसेज आला ‘तू माझ्यासोबत जेवायला येशील का ?’. एका मुलाखतीत दीपिकाने सांगितले की, तिला ओळखत असलेल्या पण कधीही न भेटलेल्या खेळाडूचा असा मेसेज पाहून तिला आश्चर्य वाटले.
मेसेजची सुरुवात रात्रीच्या जेवणाच्या ऑफरने होते, ना हाय-हॅलो ना आणखी काही. दिनेश कार्तिक आणि दीपिका चेन्नई शहरातील आहेत. दीपिकाची आई ट्रॅव्हल एजन्सी चालवते आणि दिनेश कार्तिक या एजन्सीद्वारे टॅक्सी किंवा इतर वाहने बुक करत असे.
दीपिका पल्लीकलने एका कार्यक्रमादरम्यान सांगितले होते की, ‘मला अल्पावधीतच दिनेशकडून ५-६ मेसेज आले. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या सबबी सांगून मी नकार देत असे. एकदा दिनेश म्हणाला की तू चेन्नईला कधी येणार आहेस ते सांग. मी म्हणालो मी चेन्नईला आहे, पण उद्या ऑस्ट्रेलियाला जायचे आहे. परत येईन तेव्हा भेटू. खरं तर हेच उत्तर दीपिका आणि दिनेशच्या पहिल्या भेटीचे कारण म्हणता येईल.
दिनेश कार्तिक दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता त्याच जिममध्ये पोहोचला, जिथे दीपिका व्यायाम करत असे. दीपिकाची जीमची वेळ सकाळी सहा वाजल्यापासूनची होती. दिनेशही या जीममध्ये ट्रेनिंग करायचा, पण त्याची वेळ वेगळी होती. मात्र, दीपिकाला याची माहिती नव्हती.
दुसऱ्या दिवशी दीपिका सकाळी ६ वाजता जीममध्ये पोहोचली, तेव्हा तिची भेट दिनेश कार्तिकशी झाली होती. दीपिका सांगते की, ‘मला माहित होते की दिनेश मला भेटायला तिथे आला होता, कारण तो सकाळी ट्रेनिंगसाठी कधीच आलेला नव्हता. त्याने फ्लाइटचे काय झाले ते विचारले आणि मी आजारी असल्याचे कारण सांगितले. अर्थात हे खोटे कारण होते हे मला आणि दिनेश दोघांनाही माहित होते. त्याच दिवशी पुन्हा दिनेशचा मेसेज आला की उद्याची फ्लाईट आहे का? यावर मी उत्तर दिले की नाही. पण मला उद्या संपूर्ण दिवस सराव करावा लागेल. मी सकाळी ७ वाजताच मोकळा असते. दिनेश नकार देईल अशी अपेक्षा होती, पण उत्तर आले की ठीक आहे, मी सकाळी भेटतो. दुसऱ्या दिवशी सकाळी जीमनंतर मी दिनेशला भेटले. दिनेशच्या गाडीत नाश्ता करायला निघालो. मला वाटले होते की ही फक्त एक साधारण डेट आहे आणि त्यानंतर आम्ही पुन्हा भेटणार नाही. पण आम्ही चार तास बोलत राहिलो. गप्पा संपत नव्हत्या आणि दिनेशनेच विचारले की तुला ट्रेनिंगला जायचे नाही का?
मला दोन दिवसांनी इंग्लंडला जायचे होते. त्यामुळे आम्ही त्याच दिवशी पुन्हा भेटलो. मग वाटलं प्रकरण संपवूया. आता भेटायची गरज नाही. त्यानंतर मी इंग्लंडला गेले. पण काही दिवसांनी दिनेशही तिथे पोहचला.
दीपिका म्हणते, ‘दिनेश जेव्हा इंग्लंडला आला, तेव्हा मला विचित्र वाटले. मला वाटले की हा माणूस माझ्या मागे लागला आहे. पुढचे दोन दिवस मी माझ्या प्रशिक्षणात आणि सरावात पूर्णपणे व्यस्त राहिली. मला त्याच्यासाठी वेळ नाही हे दाखवायचे होते.
दोन दिवसांनी आम्ही त्याच फ्लाइटने परतलो. योगायोगाने आमची दुबईची फ्लाइट चुकली. यामुळे आम्ही एक दिवस दुबईत राहिलो आणि नंतर तिथेही खूप गप्पा झाल्या. त्यानंतर मला वाटले की आपण हे नाते पुढे नेऊ शकतो.
यानंतर २०१३ साली या दोघांनी लग्नगाठ बांधली. आणि आता हे दोघेही जुळ्या मुलांचे आई-बाबा झाले असून झियान आणि कबीर अशी या मुलांची नावं त्यांनी ठेवली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
न्यूझीलंडविरुद्ध चौदा वर्षांचा जुना हिशोब चुकता करणार का टीम इंडिया अन् धोनी?
‘शांत राहा आणि आनंद घ्या’, पाकिस्तान-अफगानिस्तान सामन्यापूर्वी राशिद खानची चाहत्यांना विनंती