fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

नोव्हाक जोकोविचने फेडररचा पराभव करत पाचव्यांदा मिळवले विम्बल्डनचे विजेतेपद

लंडन। रविवारी(14 जूलै) विम्बल्डन 2019 स्पर्धेतील पुरुष एकेरीचा अंतिम सामना अव्वल मानांकित नोव्हाक जोकोविच आणि द्वितीय मानांकित रॉजर फेडरर यांच्यात सेंटर कोर्टवर पार पडला. अटीतटीच्या झालेल्या या ऐतिहासिक लढतीत 7-6 (5), 1-6, 7-6 (4), 4-6, 13-12 (3) अशा फरकाने जोकोविचने फेडररला पराभूत करत पाचव्यांदा विम्बल्डनचे विजेतेपद मिळवले.

4 तास 57 मिनेटे चाललेल्या या लढतीत सार्बियाच्या जोकोविचने स्विझर्लंडच्या फेडरर विरुद्ध तीन सेट टायब्रेकरमध्ये जिंकत त्याच्या कारकिर्दीतील 16 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवले. विम्बल्डनच्या इतिहासातील हा सर्वाधिक वेळ चालणारा अंतिम सामना ठरला.

फेडरर आणि जोकोविच तिसऱ्यांदा विम्बल्डनच्या अंतिम सामन्यात आमने-सामने आले होते. याआधी 2014 आणि 2015 मध्ये हे दोघे विम्बल्डनच्या अंतिम सामन्यात खेळले होते. या दोन्ही वेळेस जोकोविचने बाजी मारली होती.

रविवारी या दोघांमध्ये झालेल्या पहिल्या सेटमध्ये दोघांनीही आपापल्या सर्विस राखल्या होत्या. पण पहिला सेट टायब्रेकरमध्ये जोकोविचने जिंकला.

दुसऱ्या सेटमध्ये फेडररने जोकोविचवर चांगले वर्चस्व ठेवले होते. त्याने जोकोविचच्या सुरुवातीची दोन्ही सर्विस मोडत 4-0 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर फेडररने हा सेट 6-1 असा सहज आपल्या नावे करत सामन्यात बरोबरी केली.

तिसरा सेटही अटीतटीचा झाला आणि टायब्रेकरमध्ये गेला. यावेळीही जोकोविचनेच बाजी मारत सामन्यात आघाडी मिळवली. पण चौथ्या सेटमध्ये पुन्हा फेडररने शानदार पुनरागमन करत हा सेट 6-4 असा जिंकला. त्यामुळे हा सामना पाचव्या आणि निर्णायक सेटमध्ये गेला.

या पाचव्या सेटमध्ये जोकोविचने फेडररची सर्विस मोडत 4-2 अशी आघाडी घेतली. पण फेडररनेही माघार न घेता ब्रेक पॉइंट घेत 4-4 अशी बरोबरी साधली. त्यानंतर हे दोघेही एकमेकांना कडवी झुंज देत होते. पण 15 व्या गेममध्ये फेडरर जोकोविचची सर्विस मोडण्यात यशस्वी झाला.

यानंतर फेडररकडे दोन चॅम्पियन पॉइंट्स होते. पण जोकोविचने ही जोरदार खेळ करत फेडररला दोन्ही चॅम्पियन्स पॉइंट्स घेण्यापासून रोखले आणि सामना 8-8 असा बरोबरीचा केला. हा सामना 12-12 असा गेमपर्यंत बरोबरीचा चालला होता.

अखेर 12-12 असा सेट बरोबरीचा झाल्यानंतर टायब्रेकर झाला आणि यात जोकोविचने बाजी मारली. त्यामुळे त्याने हा सामनाही जिंकला आणि विम्बल्डनचे विजेतेपदही मिळवले.

जोकोविच आता 16 ग्रँडस्लॅम विजेतेपदांसह सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर 20 ग्रँडस्लॅम विजेतेपदांसह फेडरर आहे. तसेच 18 ग्रँडस्लॅम विजेतेपदांसह स्पेनचा राफेल नदाल दुसऱ्या स्थानावर आहे. 

याबरोबरच वयाची तिशी पार केल्यानंतरचे हे जोकोविचचे चौथे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. त्यामुळे तो वयाच्या तिशीनंतर चार ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवणारा चौथा टेनिसपटू ठरला आहे. याआधी असा कारनामा फेडरर, राफेल नदाल आणि रोड लेवर यांनी केला आहे.

तसेच वयाच्या तिशीनंतर सलग दोन विंब्लडन विजेतीपदे मिळवणारा जोकोविच ओपन एरामधला पहिलाच टेनिसपटू देखील ठरला आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

टॉप १०: फेडरर-जोकोविचबद्दल या १० खास गोष्टी माहित आहेत का?

संपूर्ण यादी: आत्तापर्यंत विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात हे खेळाडू ठरले सामनावीर

केन विलियम्सन असा पराक्रम करणारा केवळ दुसराच कर्णधार!

You might also like