सर डॉन ब्रॅडमन हे नाव क्रिकेट जगतातील सर्वात आदरणीय नाव आहे. क्रिकेटमधील पहिले विक्रमादित्य म्हणून ते ओळखले जातात. कसोटी क्रिकेटमधील जवळपास सर्वच विक्रम पहिल्यांदा त्यांच्याच नावे जमा झाले होते. ऑस्ट्रेलियासाठी 1928 ते 1948 यादरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या ब्रॅडमन यांचे काही विक्रम हे सत्तर वर्षांनंतर देखील अबाधित आहेत. त्यांचा सर्वोत्तम सरासरीचा (99.94) विक्रम तुटने तर केवळ अशक्यच!
असाच अजून एक विक्रम आहे जो आजही अबाधिक आहे. तो विक्रम आजच्याच दिवशी म्हणजे 11 जुलै रोजी केला होता. तो विक्रम म्हणजे एका दिवसात त्रिशतक झळकावण्याचा. तेव्हा ब्रॅडमन यांचे वय होते अवघे 21 वर्ष.
सन 1930च्या ऍशेस मालिकेच्या तिसऱ्या सामन्यादरम्यान त्यांनी हा विक्रम केला. मालिका 1-1 ने बरोबरीत असताना लीड्स कसोटी आघाडी घेण्याच्या दृष्टीने निर्णायक ठरणार होती. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत पहिली फलंदाजी निवडली. कर्णधार वूडफुल व आर्ची जॅक्सन सलामीला उतरले. जॅक्सन अवघी 1 धाव करून माघारी परतले. वूडफुल यांच्या साथीला सर डॉन ब्रॅडमन मैदानात उतरले. दोघांनी अप्रतिम फलंदाजी करत संघाचा डाव सावरला.
ब्रॅडमन खूपच आक्रमक खेळत होते. त्यांनी पहिल्याच सत्रात आपले शतक पूर्ण केले. वूडफुल वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करून माघारी परतले. पहिल्या सत्राच्या शेवटी, ब्रॅडमन 153 चेंडूत 105 धावा काढून नाबाद होते.
लंचनंतर, डाव सुरू झाल्यावर ब्रॅडमन यांनी आपला पहिला आक्रमक अवतार अजिबात बदलला नाही. इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेणे त्यांनी सुरु ठेवले. किपॅक्स त्यांना साथ देत होते. दुसऱ्या सत्रात ब्रॅडमन यांनी आपले द्विशतक साजरे केले होते. त्या सत्रात त्यांनी 152 चेंडूत 115 धावा बनवल्या.
जेव्हा तिसऱ्या आणि शेवटच्या सत्राची सुरूवात झाली तेव्हा ब्रॅडमन यांना आपले त्रिशतक पूर्ण करण्यासाठी 80 धावा हव्या होत्या. ब्रॅडमन त्रिशतक मारण्याच्या इराद्याने मैदानात उतरले. यावेळी त्यांनी अधिक आक्रमक होत, इंग्लंडच्या गोलंदाजांना एकही ही संधी न देता ऐतिहासिक त्रिशतक झळकावले.
त्यादिवशी, ब्रॅडमन यांनी 420 चेंडूत 309 नाबाद धावा केल्या होत्या. त्यांची ही विक्रमी खेळी दुसऱ्या दिवशीही सुरु ठेवली. मात्र, मॅगवेट टेट यांच्या गोलंदाजीवर वैयक्तिक 334 धावांवर असताना यष्टीरक्षक डकवर्थ यांच्या हाती झेल देत ते परतले.
The most fours ever hit by one batsman in an Ashes innings is 46 by Don Bradman in his innings of 334 at Headingley in 1930 #AshesFacts pic.twitter.com/K1heQvz8yK
— ICC (@ICC) November 5, 2017
आपल्या सर्वांगसुंदर खेळीत त्यांनी 449 चेंडूंचा सामना केला. या खेळी दरम्यान त्यांच्या बॅटमधून 46 सणसणीत चौकार निघाले. ब्रॅडमन यांचा हा विक्रम आजही अबाधित आहे. त्यावेळी, आतासारखी प्रतिदिनी षटकांची मर्यादा नसल्याने, पहिल्या दिवशी टाकण्यात आलेल्या 134 षटकांपैकी 70 षटके एकट्या ब्रॅडमन यांनी खेळून काढत त्रिशतकाला गवसणी घातली होती.
यानंतर भारताच्या वीरेंद्र सेहवाग याला 2009 मध्ये हा विक्रम मोडायची संधी चालून आली होती परंतु त्यादिवशी भारताला 78 षटके फलंदाजीसाठी मिळाली. त्यावेळी सेहवाग 239 चेंडूत 284 धावा करून नाबाद राहिला होता.
वाचनीय लेख-
अन् डॉन ब्रॅडमन भारताच्या महान फलंदाजाला शिवसेना व बाळासाहेबांबद्दल विचारत होते…
सर डॉन ब्रॅडमन यांच्या फलंदाजीचा 74 वर्षे जुना एकमेव रंगीत व्हिडिओ पाहिलाय का? नसेल, तर लगेच पाहा