23 जून 2013 हा दिवस भारतीय क्रिकेटसाठी एक ऐतिहासिक ठरला. याच दिवशी टीम इंडियाने इंग्लंडच्या घरात, त्यांच्यावर मात करत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 जिंकली. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने इंग्लंडला 5 धावांनी पराभूत करत हा पराक्रम साध्य केला.
ही स्पर्धा वनडे फॉर्मेटची असली तरी पावसामुळे अंतिम सामना 20-20 षटकांचा करण्यात आला होता. भारताने प्रथम फलंदाजी करताना 129 धावा केल्या. हे लक्ष्य फारसे मोठे नव्हते, पण धोनीने संघाला दिलेली मोटिवेशनल स्पीच खऱ्या अर्थाने गेमचेंजर ठरली.
धोनीने संघ हडलमध्ये स्पष्ट शब्दांत सांगितले “आसमानाकडे बघू नका, देव तुम्हाला वाचवायला येणार नाही. आपण जगातील क्रमांक एक संघ आहोत आणि तशीच खेळी करायला हवी.” या शब्दांनी प्रेरित होऊन भारतीय गोलंदाजांनी एकजुटीने लढा दिला आणि इंग्लंडला 124 धावांवर रोखले.
या विजयासोबतच धोनी तीन प्रमुख आयसीसी ट्रॉफी जिंकणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला. याआधी त्याने 2007 मध्ये टी20 वर्ल्ड कप आणि 2011 मध्ये वनडे वर्ल्ड कप भारताला जिंकवून दिला होता.
या ऐतिहासिक विजयानंतर इंग्लंडचे माजी कर्णधार नासिर हुसेन यांनी धोनीला विचारले होते की, “तुम्ही संघाला काय सांगितले?” त्यावर धोनीने वरचे विधान केले आणि त्याचं नेतृत्व आजही भारतीय चाहत्यांच्या हृदयात कोरलेले आहे.
या विजयानंतर संपूर्ण देशात जल्लोष झाला होता. विराट कोहली, रवींद्र जडेजा, आर. अश्विन आणि इतर खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. विशेषतः रवींद्र जडेजाने 33 धावा करत महत्त्वाचा जलद डाव खेळला आणि नंतर 2 बळीही घेतले. इशांत शर्माने निर्णायक क्षणी विकेट्स घेत इंग्लंडचा डाव उध्वस्त केला. या सामन्याने भारतीय संघाच्या लढवय्या वृत्तीचे दर्शन घडवले आणि एम.एस. धोनीचा ‘कूल कॅप्टन’ म्हणून असलेला दबदबा आणखी बळकट केला.






