-महेश वाघमारे
गोष्ट आहे 2005 सालची. पाकिस्तानचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. कारगिल युद्धानंतर दोन्ही देशांमध्ये पुन्हा नव्याने मैत्रीचे संबंध वाढू लागले होते. तीन कसोटी सामन्यांची मालिका आणि त्यानंतर सहा एकदिवसीय सामने अशी दौऱ्याची रूपरेषा होती.
कसोटी मालिका 1-1 ने बरोबरीत सुटल्यानंतर, एकदिवसीय मालिका प्रतिष्ठेची होऊन बसली होती. मालिकेचा पहिला सामना 2 एप्रिल रोजी कोचीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होणार होता. दोन्ही संघ तीन दिवस आधीच कोचीमध्ये दाखल झालेले. अतिशय आनंदात दोन्ही संघांचे स्वागत केले गेले. कसोटी मालिकेत विजय न मिळाल्याने भारतीय संघ जरा हताश होता पण एकंदरीत माहौल मात्र नेहमीप्रमाणे मैत्रीपूर्ण. सामन्याच्या आदल्या दिवशी भारतीय संघाचे सराव सत्र आयोजित केले होते. सरावाला जाण्याआधी, संघाची एक टीम मीटिंग होत आणि त्यानंतर संपूर्ण संघ सरावाला जात.
सर्व भारतीय संघ ठरल्याप्रमाणे, टीम मीटिंगसाठी हजर होती. अपवाद, कर्णधार सौरव गांगुली. तसा, गांगुली प्रत्येक वेळी उशिरा येण्यासाठी प्रसिद्ध होता. इकडे खेळाडूंच्या आपापसात गप्पा गोष्टी सुरु होत्या. 10-15 मिनिटांनी गांगुली मिटिंग हॉलमध्ये दाखल झाला. सर्व खेळाडू शांत झाले. क्षणार्धात, हॉलमधील वातावरण बदलून गेले.
गांगुली नेहमीप्रमाणे आपले स्मित हास्य करत, बोलायला सुरुवात करणार इतक्यात हरभजन सिंग उभा राहिला. त्याने आपल्या हातातील काही वृत्तपत्राचे कात्रणे दादाकडे सोपवली. गांगुलीने ती कात्रणे पाहताच, त्याच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. त्या वृत्तपत्रात गांगुलीची एक मुलाखत छापून आली होती. त्यात लिहिले होते की, “युवराजला मुली फिरवण्याची, हरभजनला डिस्कोमध्ये जाण्याची भारी हौस आहे. जहीर आणि सेहवाग आपल्या खेळाविषयी गंभीर नाहीत. द्रविड उपकर्णधार म्हणून काहीच सहयोग करत नाही तर सचिन स्वतःसाठी खेळतो.”
सगळ्या बातम्या वाचून गांगुलीला दरदरून घाम फुटला. कारण, त्याने अशी कुठलीच मुलाखत दिली नव्हती. गांगुलीने वर पाहिले आणि युवराज सिंग व जहीर खानने बोलायला सुरुवात केली. “दादा, आम्ही जूनियर असलो म्हणून तुम्ही काही आरोप करणार का? आम्ही देशासाठी खेळतोय आणि इमानदारीने खेळतोय.” युवा खेळाडू बोलू लागले म्हणून गांगुलीने द्रविड व सचिन या आपल्या जुन्या सहकाऱ्यांकडे पाहिले. त्यांनीही इतर खेळाडूंच्या सुरात सूर मिसळत. “दादा, तू असं बोलायला नव्हतं पाहिजेस. चुकला आहेस तू !”
आता मात्र गांगुलीचे अवसान गळाले. तो सर्वांना सांगू लागला, असे काही झालेच नाही. मी कोणतीही मुलाखत दिलेली नाही. पण त्या कात्रणांमध्ये एकच नाहीतर हिंदी, इंग्लिश आणि स्थानिक मल्याळम भाषेतसुद्धा ही मुलाखत छापून आली होती हे दिसत होते. जवळपास 15 मिनिटे खेळाडू आणि गांगुलीचा वाद चालला होता. तिकडे खाली मैदानावर कोच जॉन राईट संघाची वाट पाहत होते.
आता गांगुलीचा संयम संपण्याची बारी होती. त्याचा कंठ दाटून आला व तो म्हणाला, “तुम्हाला विश्वास बसावा म्हणून मी काय करू? जर तुम्हाला ही गोष्ट खरी वाटत असेल तर मी माझ्या कर्णधारपणाचा राजीनामा देतो.” त्यावर हरभजनने, “त्याने काय होणार?” असं म्हणत आपली बॅग उचलली आणि बाहेर चालू लागला. आता मात्र, गांगुलीच्या डोळ्यातून पाणी आले. जो संघ त्याने स्वतः बांधला होता. तो सर्व संघ त्याच्याविरुद्ध होता. कर्णधार असून एकटा पडल्याचे त्याला वाईट वाटत होते. तो मुसमुसत रूम बाहेर पडू लागला.
गांगुलीचा जुना सहकारी राहुल द्रविडला त्याची परिस्थिती पाहवली नाही. तो त्याच्या मागे गेला. त्याला थांबवत म्हणाला, “दादा आज तारीख काय आहे?” गांगुलीला समजले आपल्याला एप्रिल फूल बनवण्यात आलेले आहे. त्यानंतर, त्याला सांगितले गेले की, हा युवराज आणि भज्जीचा प्लॅन होता आणि त्यानुसार त्यांनी कालच सगळी व्यूहरचना आखली होती. सर्व संघाने देखील त्यांची साथ दिली. पुढे हरभजन सिंगने एका मुलाखतीत ही सगळी घटना उलगडून सांगितली. अशा पद्धतीने, गांगुलीला एप्रिल फुल करत युवराजने सहा वर्षांपूर्वी आपला पोपट केल्याचा बदला पूर्ण केला.
ड्रेसिंग रूम सिक्रेट्स लेखमालेतील अन्य लेख-
-ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग १०: “जित्या, कपिल पाजींची तब्येत अचानक बिघडली आहे, चल लवकर.”
ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ९: खेळाडू शांत व्हायचे नाव घेत नव्हते, अखेर सुत्र सचिनने हाती घेतली
–ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ७: …आणि १८ वर्षांचा विराट पडला सचिनच्या पाया
–ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ४: …अगदी ठरवुन त्यांनी गांगुलीला रडवले
–ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ५- त्यादिवशी भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये निवडणूक झाली
–ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ३: दादा गुडनाईट बोलून निघून गेला परंतू युवराज मात्र पूरता घाबरला
–ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग २: लक्ष्मणच्या अंघोळीने थांबला होता चालू कसोटी सामना
–ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग १: सेहवाग रडत होता तर जॉन राईट शेजारच्या खोलीत सिगरेट ओढत होते