भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील नव्या हंगामातील पहिली स्पर्धा असलेल्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेचा अंतिम सामना बेंगलोर येथे खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दक्षिण विभागाने सामन्यावर आपली पकड मजबूत केली असून, निर्णायक आघाडीसह ते विजेतेपदाकडे कूच करत आहेत.
बेंगलोर येथील चिन्नास्वामी स्टेडियम येथे खेळल्या जात असलेल्या सामन्यात पहिल्या दिवशी सर्वच गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर पश्चिम विभागाने दक्षिण विभागाचा डाव केवळ 213 धावांवर संपुष्टात आणला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पश्चिम विभागाचा फलंदाजीचा क्रम देखील ढेपाळला. दुसऱ्या दिवसाखेर त्यांचे 7 गडी 129 धावांवर बाद झाले होते. तिसऱ्या दिवशी सकाळी केवळ 17 धावांमध्ये पश्चिम विभागाचे उर्वरित तीन फलंदाज बाद झाले. दक्षिण विभागासाठी विद्वत कवीरप्पाने सात बळी मिळवत कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी केली.
आपल्या दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या दक्षिण विभागाकडे 67 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी होती. मयंक अगरवाल 35, कर्णधार हनुमा विहारी 42, रिकी भुई 37 व सचिन बेबी 28 यांच्या योगदानाच्या जोरावर दक्षिण विभागाने तिसऱ्या दिवसाच्या समाप्तीनंतर 7 बाद 181 धावा करताना 248 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे. पश्चिम विभागासाठी दुसऱ्या डावात अर्झान नागवासवाला, अतित सेठ व धर्मेंद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले असून, चौथ्या दिवशी दक्षिण विभागाचे उर्वरित फलंदाज लवकर बाद करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल.
मागील वर्षी खेळल्या गेलेल्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेत पश्चिम विभागाने दक्षिण विभागाचा पराभव करत विजेतेपद पटकावले होते. यावेळी या पराभवाचा वचपा काढण्याचा प्रयत्न दक्षिण विभाग करेल. पश्चिम विभागासाठी चौथ्या डावात फलंदाजी करणे मोठे आव्हान असेल. पश्चिम विभागाची मदार पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, सरफराज खान व चेतेश्वर पुजारा यांच्यावर असणार आहे.
(Duleep Trophy Final South Zone Took 200 Plus Lead On West Zone)
महत्वाच्या बातम्या –
अमेरिकेत सुपर किंग्सला मिळालेला पाठिंबा पाहून भावूक झाला प्लेसिस; म्हणाला, “हे आमचे कुटुंब…”
पुन्हा उडणार ‘टी20 चॅम्पियन्स लीग’चा धुरळा! ‘या’ देशांतील संघ भरणार रंग