महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. व मुंबई शहर कबड्डी असो.च्या मान्यतेने आणि जय दत्त क्रीडा मंडळ, प्रभादेवी आयोजित स्व.राजाराम साळवी उद्यान, प्रभादेवी येथील स्व.किरण बाळू शेलार क्रीडांगणावर सुरू झालेल्या राज्यस्तरीय कुमार गट कबड्डी स्पर्धेच्या उदघाटनिय सामन्यात मुंबईच्या दुर्गामाता स्पोर्ट्सने उपनगरच्या सह्याद्री मित्र मंडळाचा ४३-३२ असा पराभव केला. करण कदमने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करीत दुर्गामाताला पहिल्या डावात २५-१२अशी भक्कम आघाडी घेतली होती.पण दुसऱ्या डावात सह्याद्रीच्या भरत कलगुटकरला सूर सापडल्यामुळे त्याने एकाकी लढत दिली.
ब गटात मुंबईच्या विकास मंडळाने उपनगरच्या पार्ले स्पोर्ट्सचा अत्यंत चुरशीच्या लढतीत ३२-२४असा पाडाव केला. मध्यांतराला १५-१४अशी निसटता आघाडी घेणाऱ्या विकास मंडळाने नंतर मात्र आपल्या खेळाची गती वाढवत ८ गुणांनी पहिला साखळी विजय साजरा केला. अवधूत शिंदे, हर्षद शिंदे विकास मंडळाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. पार्लेच्या बाबुराव झोरे याने दिलेली कडवी लढत निष्फळ ठरली.
क गटात मुंबईच्या सिद्धीप्रभा फाउंडेशनने ठाण्याच्या ग्रिफिन जिमखान्याचा ३४-३० असा पाडाव करीत आगेकूच केली.मध्यांतराला १८-१६अशी आघाडी सिद्धीप्रभाकडे होती. ओमकार ढवळे, ओमकार पवार सिद्धीप्रभाकडून, तर शक्तीसिंग यादव, तेजस कदम ग्रिफिन जिमखान्याकडून उत्कृष्ट खेळ केला.
शेवटच्या सामन्यात मात्र उपनगरच्या जागर स्पोर्ट्सने मुंबईच्या विजय क्लबला ३४-२९असे चकवित क्रीडारसिकांना आश्चर्याचा धक्का दिला.मध्यांतराला १४-१६ असे २ गुणांनी पिछाडीवर पडलेल्या जागर स्पोर्ट्सने उत्तरार्धात मात्र जोरदार प्रतिहल्ला करीत हा विजय साकारला. अभिषेक ताम्हणकर, सागर सिंग जागर स्पोडंट्सच्या या विजयात चमकले. अभिषेक उपनरने आपल्या चतुरस्त्र खेळाने पूर्वार्धात विजय क्लबला २ गुणांची आघाडी मिळवून दिली होती. नंतर मात्र तो अपयशी ठरला. या स्पर्धेचे उदघाटन विभागीय नगरसेवक समाधान सरवणकर, मुंबई शहरचे जिल्हा क्रीडा अधिकारी अभय चव्हाण, स्पर्धा निरीक्षक रविंद्र देसाई यांच्या उपस्थितीत पार पडला.
आज होणारे सामने (७ मार्च २०१९)
१) सह्याद्री क्रीडा मंडळ विरुद्ध शिवशंकर क्रीडा मंडळ
२) श्री राम विरुद्ध ग्रीफिन जिमखाना
३) एस. एस. जी. फाऊंडेशन विरुद्ध विकास मंडळ
४) विजय क्लब विरुद्ध जय दत्तगुरू कबड्डी संघ