भारतात कोविड-१९ चा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. संपूर्ण भारताप्रमाणेच कोलकत्त्यामध्ये देखील रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली दिसून येते. यामुळे कोलकत्ता पोलिस आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल ( CAB ) यांनी ईडन गार्डन स्टेडियमचा वापर क्वारंटाईन सेंटर म्हणून करण्याचे ठरविले आहे.
स्टेडियम मधील पाच ब्लॉकचे ( E,F,G,H व J ) रूपांतर क्वारंटाईन सेंटरमध्ये करण्यात येणार आहे. या ब्लॉकमध्ये, प्रामुख्याने कोलकत्ता पोलिसांना क्वारंटाईन करण्यात येईल. कोलकाता पोलिसांनी CAB ला काही दिवसांपूर्वी पत्र लिहून स्टेडियममधील काही ब्लॉक पोलिसांसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.
कोलकत्ता पोलिसांमध्ये कोरोना प्रादुर्भाव वेगाने वाढलेला दिसून येतोय. सद्यस्थितीत ५०० पोलीस कोरोनाग्रस्त आहेत तर ४०० पोलीस आत्तापर्यंत बरे झाले आहेत. दोन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यूदेखील झालेला आहे.
CAB चे अध्यक्ष अविषेक दालमिया यांनी एक पत्रक जाहीर करून या गोष्टीची पुष्टी केली आहे. त्यांनी पत्रकात म्हटले आहे की, ” कोरोना महामारीच्या या कठीण समयी पोलिसांसोबत असणे हे आपले कर्तव्य आहे. पोलीस कोरोना योद्धे म्हणून आपले काम चोख बजावत आहेत. आम्ही कोणत्याही अटी शर्तीं शिवाय पोलीस प्रशासनाला स्टेडियम उपलब्ध करून देत आहोत. सर्व तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे.”
ईडन गार्डन्स सध्या ६८,००० आसनव्यवस्थेसह भारतातील सर्वात मोठे सक्रिय क्रिकेट स्टेडियम आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने या मैदानावर सर्वाधिक १३६८ आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत तर रोहितने येथे ७ आंतरराष्ट्रीय सामन्यात ७१.१२च्या सरासरीने ५६९ धावा केल्या आहेत. त्याने येथे एकदा २६४ धावा केल्या असून २ शतके व १ अर्धशतकी खेेळी त्याने या स्टेडियमवर केली आहे.