---Advertisement---

ENG vs IND 1st Test Day1: पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाज चमकले, तर दिवसाखेर भारताच्या पहिल्या डावात बिनबाद २१ धावा

On: बुधवार, ऑगस्ट 4, 2021 11:10 PM
---Advertisement---

नॉटिंघम। इंग्लंड विरुद्ध भारत संघात बुधवारपासून (४ ऑगस्ट) कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना ट्रेंट ब्रिज मैदानावर होत आहे. या सामन्यात पहिल्या दिवसाखेर भारताने पहिल्या डावात १३ षटकात बिनबाद २१ धावा केल्या आहेत. भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल प्रत्येकी ९ धावांवर नाबाद आहेत.

इंग्लंडचा डाव १८३ धावांवर संपुष्टात

या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, इंग्लंडचा पहिला डाव ६५.४ षटकांत केवळ १८३ धावांवर संपला.

इंग्लंडकडून कर्णधार जो रुटने सर्वाधिक ६८ धावांची खेळी केली. तसेच सॅम करनने नाबाद २७ आणि जॉनी बेअरस्टोने २९ धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या, तर शमीने ३ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर शार्दुल ठाकूरने २ आणि मोहम्मद सिराजने १ विकेट घेतली.

भारतीय गोलंदाजांची भेदक गोलंदाजी

पहिल्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात इंग्लंडच्या फलंदाजांनी स्वस्तात विकेट गमावल्या. अखेरच्या सत्रात डॅनिएल लॉरेन्सला शमीने ५१ व्या षटकात शुन्यावर बाद केले. तर ५६ व्या षटकात जोस बटलर बुमराहविरुद्ध खेळताना शुन्यावर बाद झाला. यानंतरही इंग्लंडचे तळातील फलंदाज फार तग धरु शकले नाही.

मात्र, याचवेळी इंग्लंडची एक बाजू जो रुटने सांभाळला होता. पण रुटलाही ५९ व्या षटकात शार्दुल ठाकूरने पायचीत करत इंग्लंडला मोठा धक्का दिला. रुट १०८ चेंडूच ११ चौकारांसह ६८ धावांवर बाद झाला. त्याच षटकात ऑली रॉबिन्सन शुन्यावर बाद झाला. त्या पुढच्या षटकात स्टुअर्ट ब्रॉडला ४ धावांवर बुमराहने बाद केले.

पण, असे असताना अखेरीस सॅम करनने एका बाजूने इंग्लंडचा डाव सावरला होता. त्याने जेम्स अँडरसनला साथीला घेत इंग्लंडला १८० धावांचा टप्पा ओलांडून दिला होता. पण अखेर जसप्रीत बुमराहने ६६ व्या षटकात अँडरसनला त्रिफळाचीत करत इंग्लंडचा डाव १८३ धावांवर संपुष्टात आणला.

रुटचे अर्धशतक

दुसरे सत्र सुरु झाल्यानंतर लगेचच इंग्लंडचा सलामीवीर डॉमनिक सिब्ली २८ व्या षटकात मोहम्मद शमीविरुद्ध खेळताना केएल राहुलकडे झेल देऊन बाद झाला. त्याने ७० चेंडूत १८ धावांचे योगदान दिले. तो बाद झाल्यानंतर मात्र, कर्णधार जो रुटने अनुभवी जॉनी बेअरस्टोला साथीला घेतले आणि संघाचा डाव उभा करण्यास सुरुवात केली. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. याबरोबरच संघाला १०० धावांचा टप्पाही पार करुन दिला.

दरम्यान, जो रुट इंग्लंडचा  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही बनला आहे. त्याने या यादीत माजी कर्णधार ऍलिस्टर कूकला मागे टाकले आहे.

रुट आणि बेअरस्टो यांची जोडी जमलेली होती. या दोघांनी काही आक्रमक फटके खेळत संघाचा डाव भक्कमपणे उभा केला होता. तसेच रुटने कसोटी कारकिर्दीतील ५० वे अर्धशतकही पूर्ण केले. पण अखेर त्यांची भागीदारी तोडण्यात मोहम्मद शमीला यश आले.

त्याने ५१ व्या षटकात बेअरस्टोला पायचीत केले. यावेळी पंचांनी नाबाद दिले होते. मात्र, भारताने डीआरएस रिव्ह्यूचा वापर केला आणि त्यात बेअरस्टो बाद असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याला २९ धावांवर माघारी परतावे लागले. त्याच्या विकेटसही पहिल्या दिवसाचे दुसरे सत्रही संपले.

इंग्लंडने दुसऱ्या सत्राखेरपर्यंत ५०.२ षटकात ४ बाद १३८ धावा केल्या.

पहिल्या सत्रात भारताचे वर्चस्व

भारतीय संघाने सामन्याची सुरुवात धमाकेदार केली. पहिल्याच षटकात पाचव्या चेंडूवर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने रॉरी बर्न्सला शुन्य धावेवर पायचीत करत माघारी धाडले. त्यानंतर डॉमनिक सिब्ली आणि जॅक क्रॉलीने इंग्लंडचा डाव सावरला. त्यांनी सावध खेळी करताना भारताला २० व्या षटकापर्यंत मोठे यश मिळू दिले नाही.

त्यांची भागीदारी रंगत असतानाच २१ व्या षटकात मोहम्मद सिराजने क्रॉलीला बाद करत ही भागीदारी तोडली. क्रॉलीने ६८ चेंडूत ४ चौकारांसह २७ धावा केल्या. त्यामुळे चौथ्या क्रमांकावर इंग्लंडचा कर्णधार जो रुटला मैदानात यावे लागले आहे. रुटने सिब्लीला साथ देत पहिल्या सत्राखेरपर्यंत आणखी विकेट जाणार नाही याची काळजी घेतली.

पहिल्या सत्राखेर इंग्लंडने २५ षटकात २ बाद ६१ धावा केल्या.

असे आहेत उभय संघ

या सामन्यासाठी भारताने ११ जणांच्या संघात केएल राहुलला संधी देण्यात आली आहे. तसेच गोलंदाजी फळीमध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज या वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे. तर रविंद्र जडेजाला फिरकीपटू म्हणून संधी देण्यात आली आहे.

या सामन्यातून मंयक अरगवाल यापूर्वीच दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. तर आर अश्विन आणि इशांत शर्मा यांना पहिल्या सामन्यातून बाहेर बसवण्यात आले आहे.

तसेच इंग्लंडच्या ११ जणांच्या संघात जॉनी बेअरस्टो, सॅम करन या खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे. तर ऑली पोपला दुखापतीमुळे या सामन्याला मुकावे लागले आहे.

असे आहेत ११ जणांचे संघ – 

भारत – रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

इंग्लंड – रॉरी बर्न्स, डॉमिनिक सिब्ली, जॅक क्रॉली, जो रूट (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, डॅनियल लॉरेन्स, जोस बटलर (यष्टीरक्षक), सॅम करन, ऑली रॉबिन्सन, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---