इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात सध्या ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. मालिकेत भारतीय संघ १-० अशा आघाडीवर होता. मात्र तिसऱ्या कसोटीत इंग्लंडने भारताचा एक डाव आणि ७६ धावा असा दारूण पराभव केला. यानंतर मालिकेत दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीवर आहेत. अशात इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने म्हटले आहे की, त्यांचा संघ ओव्हलवरच्या चौथ्या कसोटी सामन्यात पलटवाराचा सामना करण्यासाठी तयार आहे. यावेळी त्याने भारतात कर्णधार विराट कोहलीला मालिकेत चांगल्या प्रदर्शनापासून रोखण्यासाठीचे श्रेय इंग्लंड संघाच्या गोलंदाजांना दिले.
जो रूट वर्चुअल पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाला, “विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतासारखा विश्वस्तरावरचा संघ दमदार पुनरागमनाचा प्रयत्न करेल. अशात आम्हाला आत्मसंतुष्टतेपासून दूर राहावे लागणार आहे. आम्ही आणखी काहीच मिळवलेले नाही. मालिकेत बरोबरीच केली आहे. आम्ही प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यासाठी तयार आहोत. भारत जे कोणते नियोजन घेऊन उतरेल, आम्ही त्याच्यासाठी तयार आहोत.”
विराटला स्पर्धेत चांगल्या प्रदर्शनापासून रोखण्याचे श्रेय त्याने संघाच्या गोलंदाजांना दिले आहे. तो म्हणाला, “याचे श्रेय आमच्या गोलंदाजांना जाते. त्यांनी त्याच्या बॅटला शांत ठेवले आहे. मालिका जिंकण्यासाठी आम्हाला पुढेही असेच करावे लागेल. आम्ही त्याला बाद करण्याची पद्धत शोधली आहे, ज्यामुळे आम्ही भारतावर दबाव बनवण्यामध्ये यशस्वी झालो आहोत.”
चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला संधी मिळू शकते. कर्णधार विराट कोहलीने पहिल्या तीन कसोटी सामन्यात अश्विनच्या जागी रविंद्र जडोजाला संघात संधी दिली होती. मात्र आता ओव्हलवरील चौथ्या कसोटी सामन्यात या फिरकी गोलंदाजाला संधी देण्याच्या मागणीने जोर धरला आहे.
अश्विन अनिल कुंबळेनंतर हरभजन सिंगसोबत भारताचा दुसरा यशस्वी फिरकी गोलंदाज बनण्यापासून केवळ चार विकेट्सने मागे आहे. त्याने मागच्याच महिन्यात काउंटी क्रिकेटमध्ये सर्रे संघासाठी खेळताना एकाच सामन्यात सहा विकेट्स घेतल्या होत्या. न्यूझीलँडविरुद्ध जूनमध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही तो भारतासाठी सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरला होता.
रूट अश्विनविषयी बोलताना म्हणाला, “त्याची (अश्विनची) आकडेवारी स्वत:च बोलते. तो विश्वस्तरावरचा खेळाडू आहे. आम्ही त्याला आमच्या विरोधात धावा करताना आणि विकेट्स घेताना पाहिले आहे. आम्हला माहित आहे की, तो कसोटी क्रिकेटमध्ये काय करू शकतो.”