विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीपूर्वी न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात क्रिकेटपटूंच्या चांगल्या कामगिरीवरचे लक्ष विचलित करुण एका प्रेक्षकाने सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते. त्याला पाहून स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांसह, खेळाडूंनाही हसू अनावर झाले होते.
पहिल्या डावात इंग्लंड संघाला सर्वबाद केल्यानंतर न्यूझीलंड संघ त्यांच्या दुसऱ्या डावात फलंदाजी करत असताना हा प्रसंद घडला. तर झाले असे की, सामना सुरू असताना हलका पाऊस सुरू झाला होता. त्यावेळी स्टेडियममध्ये उपस्थित असलेला एक प्रेक्षक पावसापासून वाचण्यासाठी प्रयत्न करत होता. परंतु अती घाई केल्यामुळे त्याने चुकीच्या पद्धतीने रेनकोट घातला होता. ही बाब कॅमेरामॅनच्या निदर्शनात येताच त्याने त्या प्रेक्षकावर कॅमेरा झूम केला होता. त्यानंतर त्या प्रेक्षकाला जाणीव झाली की, त्याने रेनकोट उलटा घातला आहे.
हे सर्व मोठ्या स्क्रीनवर दाखवले जात होते. त्यामुळे मैदानात उपस्थित असलेल्या प्रत्येक प्रेक्षकाने या मजेशीर क्षणाचा आनंद घेतला. यासोबतच समालोचकांना देखील हसू अनावर झाले होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
What a funny moment 😍 best moment of ENG vs NZ test 😅 pic.twitter.com/3LJK4Eks1c
— middle stump (@middlestump10) June 6, 2021
या सामन्यात न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना ३७८ धावा केल्या होत्या. यामध्ये डेवोन कॉनवेने महत्वाची भूमिका बजावली होती. कॉनवेने पदार्पणाच्या सामन्यात २०० धावांची विक्रमी खेळी केली. प्रत्युत्तरात इंग्लंड संघाला अवघ्या २७५ धावा करण्यात यश आले होते. इंग्लंड संघाकडून रॉरी बर्न्स याने सर्वाधिक १३२ धावांची खेळी केली होती. या खेळीत त्याने १६ चौकार आणि १ षटकार लगावला होता.
त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड संघाने ६ बाद १६९ धावा करत डाव घोषित केला होता. यामध्ये टॉम लेथम याने सर्वाधिक ३६ धावा केल्या होत्या. यासोबतच रॉस टेलरने ३३ धावांचे योगदान दिले होते. न्यूझीलंड संघाने शेवटच्या डावात विजयासाठी इंग्लंड संघासमोर २७३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना पाचव्या दिवसाखेर इंग्लंडने १७० धावा केल्या. म्हणून हा सामना अनिर्णीत राहिला. पुढील सामना येत्या १० जूनपासून सुरू होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटी चॅम्पियनशीप अंतिम सामन्यापुर्वी ‘फॉलोऑन’ नियमाबाबत आयसीसीची मोठी घोषणा, वाचा सविस्तर
‘तो भारताचा थ्रीडी खेळाडू, त्याला संघाबाहेर करणं कठीण’; पाकिस्तानी खेळाडूकडून स्तुती
माजी ऑसी दिग्गजाने निवडले जगातील ५ सर्वोत्कृष्ट गोलंदाज, बुमराहला नाही दिली जागा