---Advertisement---

शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारात नेपाळचं हृदय तुटलं; इंग्लंडने कसाबसा सामना जिंकला

On: रविवार, फेब्रुवारी 8, 2026 6:46 PM
---Advertisement---

टी20 विश्वचषक 2026 मधील पाचव्या सामन्यात इंग्लंडने नेपाळला 4 धावांनी हरवले. या थरारक सामन्यात नेपाळ संघाने शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूपर्यंत लढा दिला. मात्र सॅम करनच्या धारदार गोलंदाजीसमोर नेपाळ संघाने केवळ 4 धावांनी सामना गमावला. पहिल्या डावात खेळताना इंग्लंडने मर्यादित 20 षटकात 7 बाद 184 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात नेपाळ संघाला 6 बाद 180 धावा करत्या आल्या.

इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र इंग्लंडची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही. सुरुवातीचे गडी लवकर बाद झाल्यानंतर जेकब बेथेल आणि कर्णधार हॅरी ब्रूक यांनी डाव सावरत अर्धशतकी खेळी केली. याशिवाय विल जॅक्सने 39 धावांची आक्रमक खेळी करत संघाला भक्कम धावसंख्या उभारून दिली. इंग्लंडने 20 षटकांत 184 धावा केल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना नेपाळनेही जबरदस्त झुंज दिली. नेपाळचा संघ अखेरपर्यंत सामन्यात टिकून होता. शेवटच्या षटकात विजयासाठी 10 धावांची गरज होती. सॅम करन हे शेवटचे षटक टाकत होता. पहिल्या पाच चेंडूंवर त्याने केवळ 4 धावा दिल्या. अखेरच्या चेंडूवर नेपाळला विजयासाठी 6 धावांची आवश्यकता होती, मात्र करनने लो फुलटॉस टाकत सामन्याचा निकाल इंग्लंडच्या बाजूने झुकवला. त्या चेंडूवर लोकेशला केवळ 1 धाव काढता आली.

नेपाळकडून डावाची सुरुवात आसिफ शेख आणि कुसल भुर्तेल यांनी केली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 37 धावांची भागीदारी झाली. मात्र आसिफ शेख 7 धावा करून लियाम डॉसनच्या चेंडूवर बाद झाला. उत्तम फॉर्ममध्ये दिसणारा कुसल भुर्तेलही 29 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला.

यानंतर कर्णधार रोहित पौडेल आणि दीपेंद्र सिंग एरी यांनी डाव सावरत धावगती वाढवली. दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 82 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली, ज्यामुळे सामना अधिकच रंगतदार झाला. मात्र निर्णायक क्षणी दीपेंद्र सिंग एरी 44 धावा करून बाद झाला, तर कर्णधार रोहित पौडेलही 39 धावांवर आपला विकेट गमावून माघारी परतला. त्यानंतर, फलंदाजीसाठी आलेल्या लोकेश बामने धावगती स्थिर ठेवली. त्याने 20 चेंडूत नाबाद 39 धावा केल्या, परंतु तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. या सामन्यात इंग्लंडकडून लियाम डॉसनने 2 बळी घेतले, तर सॅम करनने डावाच्या शेवटच्या षटकात फक्त 5 धावा देऊन आपल्या संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---