दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात (ENG vs SA) इंग्लंडने ११८ धावांनी विजय नोंदवत तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. मँचेस्टरमध्ये झालेला हा सामना पावसामुळे २९-२९ षटकांचा करण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ शेवटच्या षटकात २०१ धावा करून बाद झाला. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ २०.४ षटकांत अवघ्या ८३ धावांत गारद झाला. इंग्लंडच्या सॅम करनला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी (३५ धावा, १ बळी) सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या इंग्लंडला २२ धावांवर जेसन रॉयच्या रूपाने पहिला धक्का बसला. फिल सॉल्टने वेगाने धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र, १० चेंडूत १७ धावा करून तो बाद झाला. गेल्या सामन्यात अर्धशतक झळकावणाऱ्या जो रूटलाही केवळ १ धाव करता आली. जॉनी बेअरस्टो चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. मात्र, त्याला २८ धावांवर ड्वेन प्रिटोरियसने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मोईन अली आणि कर्णधार जोस बटलर अनुक्रमे ६ आणि २८ धावा काढून बाद झाले. १०१ धावांपर्यंत सहा बळी गमावणारा इंग्लिश संघ अडचणीत दिसत होता. मात्र, इथून खालच्या फळीतील फलंदाजांनी शानदार फलंदाजी केली. लियाम लिव्हिंगस्टोनने ३८ आणि सॅम करनने ३५ धावांचे योगदान दिले. त्याचवेळी डेव्हिड विलीनेही २१ धावा केल्या. मात्र, इंग्लंडला त्यांची पूर्ण षटके खेळता आली नाहीत. दक्षिण आफ्रिकेकडून ड्वेन प्रिटोरियसने सर्वाधिक चार बळी मिळवले.
लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. चार षटकांतच संघाचे चार मोठे फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. जानेमन मालन, रासी व्हॅन डर डसेन आणि एडेन मार्कराम यांना खातेही उघडता आले नाही. क्विंटन डी कॉकही केवळ ५ धावा करू शकला. दक्षिण आफ्रिकेचे चार गडी केवळ सहा धावांवर बाद झालेले. अखेर त्यांचा संपूर्ण संघ ८३ धावांत सर्वबाद झाला. हेन्रिक क्लासेनने सर्वाधिक ३३ धावा केल्या. इंग्लंडच्या आदिल रशीदने सर्वाधिक तीन बळी घेतले. आता अखेरचा निर्णय सामना २४ जुलै रोजी हेडिंग्ले येथे खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
WIvIND: काट्याच्या लढतीत टीम इंडियाचा विजयाने श्रीगणेशा; वेस्ट इंडिज अवघ्या ३ धावांनी पराभूत
वेस्ट इंडीजविरुद्धच्या लाईव्ह सामन्यात कर्णधार धवनने केले ‘हे’ कृत्य, समालोचकांच्याही बत्त्या गुल
ही कसली व्यथा! कॉमनवेल्थ गेम्ससाठी भारतीय महिला संघ सज्ज, पण व्हिसा वाढवतंय टेन्शन