श्रीलंकेचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे, जिथे दोन संघांमध्ये कसोटी मालिका खेळली जात आहे. यजमान संघानं पहिला सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. मात्र पहिल्या सामन्यानंतर इंग्लंडला मोठा झटका बसला. संघाचा धोकादायक वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे.
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुड मांडीच्या दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मार्क वुड खेळला होता. यानंतर तिसऱ्या दिवशी तो जखमी झाला. तेव्हापासून तो मैदानावर परतला नाही. त्यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डानं माहिती दिली की, मार्क वुड मालिकेतील उर्वरित सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही.
इंग्लंड क्रिकेट बोर्डानं माहिती शेअर केली की, “मार्क वुड श्रीलंकेसोबत सुरू असलेल्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. स्कॅनिंग केल्यानंतर त्याच्या उजव्या मांडीला ताण आल्याचं आढळून आलं. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी वुडला दुखापत झाली. त्यानंतर तो दुसऱ्या दिवशी गोलंदाजी करण्यासाठी मैदानात आला नाही. ”
मार्क वुड मालिकेतून बाहेर पडल्यानंतर उर्वरित सामन्यांसाठी त्याच्या बदली खेळाडूची घोषणाही करण्यात आली. वुडच्या जागी जोश हलचा इंग्लंड संघात समावेश करण्यात आला आहे. इंग्लंड विरुद्ध श्रीलंका दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सवर खेळला जाणार आहे. त्याआधी, सोमवारी संपूर्ण इंग्लंड संघ लंडनमध्ये जमणार असून, त्यादरम्यान जोश हलही संघासोबत असेल. 20 वर्षीय जोश हलला प्रथमच इंग्लंडच्या वरिष्ठ संघाकडून खेळण्याची संधी मिळाली आहे.
पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडनं श्रीलंकेचा 5 गडी राखून पराभव केला. या सामन्यात जेमी स्मिथनं इंग्लंडसाठी चमकदार कामगिरी केली. त्यानं पहिल्या डावात 111 आणि दुसऱ्या डावात 39 धावा केल्या. या कामगिरीसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
हेही वाचा –
तीन वर्षांत 4 उलटफेर, पाकिस्तानी संघाचा प्रत्येक फॉरमॅटमध्ये लाजिरवाणा पराभव
WTC गुणतालिकेत पाकिस्तानची घसरण, भारताचा नंबर कितवा? सर्वकाही जाणून घ्या
सामनावीराची बक्षीस रक्कम पूरग्रस्तांना दान, बांगलादेशच्या फलंदाजाचा कौतुकास्पद निर्णय