इंग्लंडच्या संघाला चेन्नई येथील भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. पहिल्या सामन्यातील विजयाने इंग्लंडच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. पण भारतीय संघाने जोमाने पुनरागमन करत इंग्लंडला तब्बल ३१७ धावांनी मात दिली. मात्र या पराभवानंतरही मालिका विजयाची आम्हाला अजूनही संधी आहे, अशी प्रतिक्रिया इंग्लंडचा कर्णधार जो रूटने दिली आहे.
“पुनरागमन करणे अजूनही शक्य”
दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने सर्व आघाड्यांवर मत दिली असली, तरी मालिकेत पुनरागमन करण्याच्या इंग्लंडच्या शक्यता संपलेल्या नाहीत, असे जो रूटचे मत आहे. सामन्यानंतर बोलताना तो म्हणाला, “मी मागच्या सामन्यानंतर देखील बोललो होतो की आमचे पाय जमिनीवर असणे गरजेचे आहे. पहिल्या सामन्यानंतर आम्ही अति आनंदित होण्याची गरज नव्हती, तसेच या सामन्यातील पराभवाने आम्ही अति निराश वाटून घेण्याची गरज नाही.”
इंग्लंडने याआधी देखील अशा कठीण परिस्थितीचा सामना केला आहे हे सांगताना रूट म्हणाला, “आम्ही अशा अवघड परिस्थितींचा सामना याआधीही केला आहे. अशा परिस्थितीतही परदेशात चांगली कामगिरी केली आहे. या सामन्यात भारताने आम्हाला तीनही आघाड्यांवर मात दिली, हे आम्ही खुल्या दिलाने मान्य करत आहोत. फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर भारतीय खेळाडूंनी आपले तंत्र कसे वापरले, हे आम्ही शिकण्याचा प्रयत्न करू. आणि त्यातून पुढील कसोटी सामन्यासाठी लवकरात लवकर आवश्यक त्या सुधारणा करू.”
“गोलंदाज दबाव कायम ठेवण्यात ठरले अपयशी”
या सामन्यातील इंग्लिश गोलंदाजांच्या कामगिरीवर जो रूटने काहीशी नाराजी प्रकट केली. तो म्हणाला, “गोलंदाजांनी सतत दबाव कायम ठेवण्याबद्दल आम्ही चर्चा केली होती. मात्र आम्ही ते अमलात आणू नाही शकलो. विशेषतः पहिल्या दिवशी गोलंदाज दबाव कायम ठेवण्यात अपयशी ठरले. मात्र या गोष्टीवर उर्वरित दोन सामन्यांपूर्वी आम्ही अजून काम करू शकतो. तसेच फलंदाजांनाही प्रतिस्पर्धी संघावर दबाव आणण्यासाठी धावफलक हलता ठेवावा लागेल.”
इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स या सामन्यात खास कामगिरी करू शकला नाही. तसेच त्याने या सामन्यात फारशी गोलंदाजीही केली नाही. याबाबत विचारले असता रूट म्हणाला, “स्टोक्स पूर्णपणे तंदुरुस्त आहे. त्याला गोलंदाजी न देण्याचा निर्णय हा आमच्या रणनीतीचा भाग होता. खेळपट्टीचे स्वरूप पाहून त्याला एक-दोन षटकांपेक्षा अधिक गोलंदाजी न देण्याचे आम्ही ठरवले होते. मात्र त्याच्या तंदुरुस्तीबाबत कोणतीही समस्या नाही.”
महत्वाच्या बातम्या:
कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्याच्या भारताच्या स्वप्नाचा होणार चक्काचूर? अजब आहे कारण
सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यापर्यंत पोहचलेला एबी!!
आयपीएल लिलावात या चौघांवर असेल चेन्नईची नजर, एका विदेशी खेळाडूचा समावेश