सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यापर्यंत पोहचलेला एबी!!

-शरद बोदगे

गोष्ट खूप जूनी नाही. दीड वर्षापू्र्वी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील अदिवासी भागातील २० मुलं-मुली मामाच्या गावाला जाऊया उपक्रमांतर्गत पुणे शहरात आली होती. यावेळी या मुलांना पुण्यातील शिक्षण, क्रीडा तसेच अन्य क्षेत्रांची माहिती दिली जात होती. तसेच रोज शहरातील वेगवेगळ्या ऐतिहासिक ठिकाणांच्या भेटी घडवल्या जात होत्या.

एक दिवस सकाळी शनिवारवाडा पाहिल्यावर दुपारच्या सत्रात ब्लेड ऑफ ग्लोरी या क्रिकेट संग्रहायला भेट द्यायचं ठरलं. गाडीचा ड्रायव्हर जेवायला गेल्यामुळे सर्व मुले गाडीची वाट पहात शनिवारवाड्याजवळील मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली उभी होती.

शहरात प्रथमच आल्यामुळे सर्वजण आनंदात होते. पुढचा टप्पा ब्लेड ऑफ ग्लोरी असल्यामुळे आणि गाडी यायला वेळ असल्यामुळे मी मुलांना सहज विचारले की “तुम्ही मला तुमचा आवडता खेळाडू सांगा, मी तुम्हाला त्याची खरोखरची बॅट दाखवणार. ”

ही मुले मुळात अशा भागातुन आली होती जिथे अनेकांच्या घरात आजही लाईट नाही. २० पैकी एका मुलाच्या घरात टीव्ही होता तर दोन जणांच्या घरी मोटारसायकल होती. त्यामुळे जे खेळ हे पुर्वापार खेळले जातात किंवा ज्या खेळांना कोणत्याही साधनाची गरज पडत नाही असे खेळ त्या भागात विशेष करुन खेळले जातात.

अशात मी प्रश्न विचारल्यावर मला स्पष्ट आठवत की दोन मुलांनी रोहीत शर्मा, एकाने विराट, दुसऱ्याने हार्दिक तर एकाने एमएस धोनी सांगितलं. पण पाठीमागे उभ्या असलेल्या एका मुलाने मला सांगितलं की “मला एबी डिविलियर्सची बॅट पहायची आहे.” बाकींच्यानीही लगेच त्याच्या हो मधे हो मिळवत एबीची बॅट पहायचा हट्ट केला.

मी तेव्हा अक्षरश: अवाक् झालो होतो. ज्या मुलांना भारतीय संघातील ४-५ खेळाडूंचीही नावं माहीत नाही त्यांना एबी माहित असणं म्हणजे माझ्यासाठी धक्कादायक आणि आश्चर्यचकित करणारी गोष्ट होती.

भारतात आजपर्यंत अनेक परदेशी खेळाडू खेळून गेले आहेत. त्यांनी भारताविरुद्ध मोठ्या खेळीही उभारल्या. असे असताना या खेळाडूवर भारतीय एवढं प्रेम का करतात याच उत्तर आजही मिळालं नाही.

स्फोटक फलंदाज म्हणालं तर डेविड वार्नर, ग्लेन मॅक्सवेल किंवा शाहिद आफ्रिदीही भारतात खेळले आहे किंवा भारताविरुद्ध वेगवेगळ्या देशात खेळले आहेत. एबीला बऱ्यापैकी समकालीन असलेली राॅस टेलर किंवा केविन पीटरसन यांनीही एबी सारखीच कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनीही पारंपारिक क्रिकेट न खेळता स्वत:ची एक वेगळी शैली तयार केली होती. मग हाच का? अशी काय जादू आहे या खेळाडूकडे की ज्या घरात आजही लाईट पोहचली नाही तिथल्या मुलांनाही हा खेळाडू माहित असावा?

आजपर्यंत ब्लेड्स ऑफ ग्लोरी या संग्रहालयात अनेक वेळा गेलो आहे. परंतु एबी आणि युवीची बॅट आवर्जून पाहतो. हिरव्या आणि काळ्या रंगाच स्टिकर असलेली ती बॅट कायम लक्ष वेधून घेते. मामाच्या गावाला जाऊया या उपक्रमांतर्गत जी मुले आली होती त्यांच्याबरोबर जेव्हा पुन्हा ही बॅट पाहिली तेव्हा एबीवर भारतीयांच असलेलं प्रेम, त्यावर असलेला विश्वास आणि त्याची १४ वर्षाची कारकिर्द चटकणं डोळ्यासमोर आली.

You might also like