इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील लॉर्ड्स कसोटी सामना रोमांचक स्थितीत आला आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघ ६ विकेट्स गमावून १८१ धावांवर आहे. त्यांनी १५४ धावांची आघाडी घेतली असून अजून ४ विकेट्स शिल्लक आहेत. त्यातही यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत नाबाद असल्याने संघाला २०० धावांच्या आघाडीची अपेक्षा असणार आहे. मात्र जरी भारतीय संघ इतक्या धावा करू शकला नाही, तरीही त्यांच्या विजयाच्या आशा जिवंत असतील. ते कसं?, चला बघूयात…
कोणत्याही क्रिकेटच्या मैदानावर चौथ्या अर्थातच शेवटच्या डावात फलंदाजी करणे सोपे नसते. त्यातही यजमानांची पाहुण्यांविरुद्धची चौथ्या डावातील आकडेवारी खूपच खराब आहे. उभय संघात चौथ्या डावापर्यंत गेलेल्या शेवटच्या ३ सामन्यांबद्दल पाहिल्यास, इंग्लंड संघ कशाबशा १६५ धावाही उभारु शकला नाही. हीच बाब भारतीय संघासाठी फायदेशीर ठरणार आहे.
फेब्रुवारी २०२१ मध्ये चेन्नई येथे झालेल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात इंग्लंड संघ चौथ्या डावात फक्त १६४ धावा करू शकला होता. भारताने हा सामना ३१७ धावांनी जिंकला होता. तत्पूर्वी २०१६ मध्ये विशाखापट्टनम येथील कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात इंग्लंडचा संघ १५८ धावांपर्यंत मजल मारू शकला होता.
मोईन अलीचे फॉर्मात येणे भारतासाठी फायदेशीर
इंग्लंड संघाचा फिरकीपटू मोईन अली याने भारताच्या दुसऱ्या डावात आतापर्यंत २ विकेट्स घेतल्या आहेत. डावाच्या सुरुवातीला विकेट्ससाठी झगडणारा मोईन अंतिम षटकांमध्ये मात्र लयीत आला होता. त्याने ७६ व्या षटकात भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला ६१ धावांवर बाद केले होते. तर ८० व्या षटकात ३ धावांवर रविंद्र जडेजाची विकेट घेतली होती.
एकंदरीत सांगायचे झाले तर, त्याला लॉर्ड्सच्या खेळपट्टीकडून मदत मिळाली होती. अशात भारताच्या फिरकीपटू रविंद्र जडेजासाठी ही गोष्ट लाभदायी ठरेल. तसेच वेगवान गोलंदाजही या मैदानावर पटापट विकेट्स घेऊ शकतात. यामुळे इंंग्लंडला कमी धावांवर रोखत भारतीय संघ सामना खिशात घालण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
राहुलवर फक्त शॅम्पेन कॉर्क फेकले, माझ्यावर तर बाटल्या फेकल्या होत्या; दिग्गजाने ओढले ताशेरे
कमी प्रकाशातही पंचांनी चालू ठेवला खेळ, विराट-रोहितचा चढला पारा; राग व्यक्त करताना व्हिडिओ व्हायरल
कर्णधार रूटच्या संयमाचा तुटला बांध, भर मैदानात पंतसोबत घातला वाद; फोटो व्हायरल