इंग्लंड क्रिकेट संघ सध्या नेदरलँड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात इंग्लंडला नेदरलँडविरुद्ध ३ सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. यातील पहिला वनडे सामना शुक्रवारी (दि. १७ जून) ऍमस्टेल्विन येथे पार पडला. या पहिल्याच सामन्यात इंग्लंड संघाने इतिहास विक्रमांची रांगच लावली. विशेष म्हणजे, यातील एक विक्रम असा आहे, जो त्यांनीच रचला होता.
इंग्लंडने चोपल्या वनडेतील सर्वोच्च धावा
इंग्लंड क्रिकेट (England Cricket) संघाने रचलेल्या विक्रमांमधील सर्वात मोठा विक्रम म्हणजे वनडे क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्येचा. इंग्लंडने या सामन्यात निर्धारित ५० षटकात फक्त ४ विकेट्स गमावत तब्बल ४९८ धावा चोपल्या. यासह त्यांनी आपलाच ४ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. सन २०१८मध्ये इंग्लंड संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सामन्यात ४८१ धावा चोपल्या होत्या.
नेदरलँडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडचे सर्वाधिक षटकार
नेदरलँड (Netherlands) संघाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात इंग्लंड संघाच्या फलंदाजांनी एकूण २६ षटकार भिरकावले. हा वनडे क्रिकेटमधील एका डावात सर्वात षटकार ठोकण्याचा विक्रम आहे. इंग्लंडने या बाबतीत आपलाच विक्रम मोडला आहे. यापूर्वी त्यांनी २०१९मध्ये अफगाणिस्तान संघाविरुद्ध मॅनचेस्टर येथे खेळताना २५ षटकार मारले होते. त्याचवर्षी इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्ध सेंट जॉर्ज येथे झालेल्या वनडेच्या एका डावात २४ षटकार मारले होते.
जोस बटलरचे वेगवान शतक
या सामन्यात इंग्लंड संघाचा फलंदाज जोस बटलर (Jos Buttler) याने आपल्या फलंदाजीतून नेदरलँडच्या गोलंदाजांवर आग ओकली. त्याने अवघ्या ४७ चेंडूत शतक झळकावले. हे इंग्लंड संघाकडून झळकावलेले सर्वात वेगवान शतक आहे. यापूर्वीचे वेगवान शतकही बटलरच्याच नावावर आहे. त्याने पाकिस्तानविरुद्ध खेळताना ४६ चेंडूत शतक झळकावलं होतं.
जोस बटलरचा असाही विक्रम
जोस बटलर याने नेदरलँडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात वेगवान शतक झळकावलेच. त्यासोबतच त्याने दुसऱ्या सर्वात वेगवान १५० धावाही चोपल्या. त्याने अवघ्या ६५ चेंडूत १५० धावा पूर्ण केल्या. वनडेत सर्वात वेगवान १५० धावा चोपण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एबी डिविलियर्स याच्या नावावर आहे. बटलरने या सामन्यात ७० चेंडूत नाबाद १६२ धावा चोपल्या. ही त्याची वनडेतील सर्वोच्च धावसंख्या आहे.
लियाम लिविंगस्टोनचे वेगवान अर्धशतक
नेदरलँडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात लियाम लिविंगस्टोन यानेही आपल्या बॅटमधून धावांची बरसात केली. त्याने वनडे इतिहासातील दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक पूर्ण केले. हे अर्धशतक करण्यासाठी त्याला फक्त १७ चेंडूंची गरज पडली. सर्वात वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम एबी डिविलियर्स याच्या नावावर आहे. त्याने वनडेत १६ चेंडूत ५० धावा चोपल्या आहेत.
तीन खेळाडूंनी झळकावले शतक
या सामन्यात इंग्लंडकडून एक दोन नाही, तर तब्बल ३ फलंदाजांनी शतक झळकावले. यामध्ये फिल सॉल्ट (१२२), डेविड मलान (१२५) आणि जोस बटलर (नाबाद १६२) यांनी शतक झळकावले. इंग्लंडच्या कोणत्याही ३ फलंदाजांनी एकाच वनडे सामन्यात शतक झळकावण्याची ही पहिलीच वेळ आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने वनडेत असा कारनामा २ वेळा केला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिकेच्या पराभवाला जबाबदार कोण? केशव महाराजने ‘यांच्या’वर फोडलं अपयशाचं खापर