मंगळवारी (०९ फेब्रुवारी) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड संघातील पहिला कसोटी सामना पार पडला. या सामन्यात यजमान भारतीय संघाचे पारडे जड असल्याचे म्हटले जात होते. परंतु पाहुण्या इंग्लंडने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण विभागात दमदार कामगिरी करत २२७ धावांनी भारताला नमवले.
इंग्लंडने मागील १० वर्षात सर्वाधिक वेळा भारतावर मिळवलाय विजय-
दुर्दैवाची बाब म्हणजे, मागील १० वर्षातील भारताचा हा मायभूमीतील पाचवा कसोटी पराभव होता. त्यातही इंग्लंडच्या हातून सर्वाधिक ३ वेळा भारतीय संघ चितपट झाला आहे. २०१० ते २०२१ या कालावधीत एकूण ८ संघ भारत दौऱ्यावर आले होते. त्यापैकी केवळ ३ संघांना भारताला कसोटीत पराभूत करण्यात यश आले आहे. यामध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश होतो.
इंग्लंडने चेन्नई कसोटीपुर्वी २०१२ साली भारताविरुद्धचे २ कसोटी सामने जिंकले होते. तर ऑस्ट्रेलिया (२०१७) आणि दक्षिण आफ्रिकाने (२०१०) प्रत्येकी एक वेळा भारतीय संघाला भारतात पराभूत केले आहे.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात इंग्लंडच्या हातून भारत सर्वाधिक वेळा पराभूत-
कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील आकडेवारीविषयी बोलायचे झाले तर, १९३३ ते २०२१ दरम्यान इंग्लंडने भारत दौऱ्यावर ६१ कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील तब्बल १४ सामन्यात इंग्लंडने विजयी पताका झळकावली आहे. तर १९ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. उर्वरित २८ सामने अनिर्णीत राहिले होते. यासह कसोटी क्रिकेटमध्ये भारतात भारताला सर्वाधिक वेळा पराभूत करण्याच्या विक्रमात इंग्लंड अव्वलस्थानी विराजमान आहे.
इंग्लंडबरोबर वेस्ट इंडिजही संयुक्तपणे प्रथम स्थानावर आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचा या बाबतीत दुसरा क्रमांक लागतो. त्यांनी भारताला त्यांच्याच भूमीत १३ वेळा पराभूत केले आहे. याव्यतिरिक्त इतर कोणताही संघ भारताला ५ पेक्षा जास्त कसोटी सामन्यात पराभूत करू शकला नाही.
इंग्लंडचा भारतावर २०० हून अधिक धावांनी विजय-
नुकत्याच पार पडलेल्या चेन्नई कसोटीत भारताचा पहिला डाव ३३७ धावांवर संपुष्टात आला होता. भारताकडून रिषभ पंतने ९१, चेतेश्वर पुजाराने ७३ आणि वॉशिंग्टन सुंदरने नाबाद ८५ धावांची अर्धशतकी खेळी केली होती. त्याआधी इंग्लंडने जो रुटच्या २१८ धावांच्या द्विशतकी आणि डॉम सिब्ली(८७) व बेन स्टोक्सच्या(८२) अर्धशतकाच्या जोरावर पहिल्या डावात ५७८ धावा उभारल्याने त्यांनी पहिल्या डावात २४१ धावांची आघाडी घेतली होती.
यानंतर इंग्लंडने फॉलोऑन न देता दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी दुसऱ्या डावात सर्वबाद १७८ धावा केल्या आणि पहिल्या डावातील २४१ धावांच्या आघाडीसह भारताला ४२० धावांचे आव्हान दिले होते. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात भारताकडून आर अश्विनने सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या होत्या.
त्यानंतर ४२० धावांचा पाठलाग करताना भारताकडून कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक ७२ धावा केल्या. त्याच्यापाठोपाठ शुबमन गिलने ५० धावांची खेळी केली. अन्य कोणत्याही फलंदाजाला २० धावांचा टप्पाही पार करता आला नाही. इंग्लंडकडून या डावात जॅक लीचने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर जेम्स अँडरसनने ३ विकेट्स घेतल्या. याशिवाय डॉमनिक बेस बेन स्टोक्सने आणि जोफ्रा आर्चरने प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या-
याद है, मैंने पेहले ही चेतावणी दी थी..! चेन्नई कसोटीतील भारताच्या दारुण पराभवानंतर पीटरसनचा टोमणा
सहा पैकी सहा! कर्णधार रुटचा आशिया खंडातही डंका, केला ‘हा’ मोठा रेकॉर्ड






